अडावद, लोकशाही न्युज नेटवर्क
सावधान.. पाणीपुरी खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.. पाणीपुरी खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाल्याची घटना चोपडा तालुक्यातील अडावद येथे घडली आहे.
सोमवार १७ जून रोजी कमळगाव येथे आठवडे बाजार भरत असतो . या बाजारात आसपासच्या गावातील अनेक लोक बाजारासाठी येत असतात. तेथे एका लोटगाडीवर पाणीपुरी विकली जाते. या लोटगाडीवर आसपासचे गाव चांदसनी, पिंप्री, मितावली येथील अनेक लहान मुले, तरुण,वृद्ध अनेकांनी पाणीपुरी खाल्ल्याने सोमवार रोजी रात्री पर्यंत कोणालाही काहीच त्रास जाणवला नाही. सकाळी मंगळवार सकाळी १० ते ११ वाजेच्या सुमारास अनेकांना त्याची लक्षणे जाणून लागली.
काहींना ताप, उलटी, मळमळ चक्कर येणे अशी लक्षणे जाणवल्याने काहींनी खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार घेतला तसेच रुग्णांची संख्या वाढताच लोकांनी अडावद येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास जाऊन उपचार घेतला. यावेळी आरोग्य केंद्राबाहेर प्रचंड गर्दी झाली होती.
यावेळी गावातील स्थानिक नागरिक, प्रशासकीय, लोकप्रतिनिधी, तरुण, गावातील खाजगी क्लिनिक सेंटरचे डॉक्टर यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. ही परिस्थिती फार भयावह होती. विषबाधा झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अडावद प्राथमिक केंद्राचे डॉक्टर अर्चना पाटील, इतर सहकारी, राकेश पाटील, सचिन महाजन, अडावद ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच, गावातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. सदर घटनेची बातमी कळताच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य विभागातील कर्मचारी यांनीही पाहणी केली.