लोकशाही न्यूज नेटवर्क
मध्यप्रदेशातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना त्यांच्या मराठी भाषेचे शिक्षण घेता यावे यासाठी मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ या शहरात दि. १९ जानेवारी ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान पाच दिवसीय मराठी विषय अभ्यासक्रम निर्मिती सदस्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात माध्यमिक आश्रमशाळा करगाव ता. चाळीसगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा चाळीसगावचे कार्याध्यक्ष कवी मनोहर आंधळे यांची मराठी विषय पाठ्यपुस्तक निर्मिती तज्ज्ञ सदस्य म्हणून “राज्य शिक्षा केंद्र, भोपाळ” तर्फे निवड करण्यात आली आहे.
सदर मध्यप्रदेशाचा संपूर्ण नवीन शालेय अभ्यासक्रम हा जून २०२७ ह्या शैक्षणिक वर्षापासून अंमलात येणार आहे. इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित मराठी, उर्दू व हिंदी भाषेतील सर्व विषयांच्या पुस्तकांची येणाऱ्या २० वर्षांसाठी ही निर्मिती होणार आहे. असे मध्यप्रदेश राज्याचे शिक्षण मंत्री उदय प्रतापसिंह यांनी दि. १९ जानेवारी २०२६ रोजीच्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले. मध्यप्रदेशातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी “प्रथम भाषा मराठी” असलेल्या पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी आपणास मराठी विषय तज्ज्ञ सदस्य म्हणून निमंत्रित करीत आहोत. असे अपर संचालक राज्य शिक्षा केंद्र भोपाळ यांच्या लेखी आदेश पत्रानुसार प्राप्त झाले.
कवी मनोहर आंधळे यांनी उपरोक्त पाच दिवसीय मराठी विषय अभ्यासक्रम निर्मिती कार्यशाळेत सहभागी होऊन इयत्ता पहिली, तिसरी, पाचवी व सातवी या वर्गांसाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील एकूण २० सदस्यांसह कामकाज सुरू केले असून संपूर्ण अभ्यासक्रम पुस्तक निर्मितीस वर्षभराचा कालावधी लागणार आहे. त्या अनुषंगाने दर दोन महिन्यांनी पाच, पाच दिवसांच्या कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. या अभ्यासक्रम निर्मितीसाठी मराठी विषय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून भुसावळ येथील शिक्षक डॉ. जगदिश पाटील व एरंडोल येथील सेवानिवृत्त प्रा. कवी वा. ना. आंधळे यांची नियुक्ती केलेली आहे.
मनोहर आंधळे यांच्या प्रशंसनीय निवडीबद्दल मध्यप्रदेश अभ्यासक्रम मंडळ सदस्य भागिरथ कुमरावत, मराठी भाषा समन्वयक श्रीमती चंद्रकांता कनाथे यांचेसह म. सा. प. पुणे शाखा-चाळीसगावचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप, उपाध्यक्ष गणेश आढाव व कार्यकारी मंडळ पदाधिकारी, सदस्यांसह शाखेचे विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त, पत्रकार किसनराव जोर्वेकर, विश्वस्त सदस्य उत्तमराव काळे, शिवाजी साळूंके, सुधीर पाटील तसेच सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ चाळीसगाव चे अध्यक्ष जी. जी. चव्हाण, चिटणीस राजेश राठोड, उपाध्यक्ष मच्छिंद्र राठोड आणि पिंपरखेड तांडा, करगाव, राजदेहरे या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, म. सा. प. सभासद व मित्र परिवाराने कवी आंधळे यांचे अभिनंदन केले आहे.