वरणगांव,लोकशाही न्यूज नेटवर्क
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेंतर्गत देशभरातील पाचशे कंपन्यांमध्ये एक कोटी युवक-युवतींसाठी इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वरणगांव शहरातील २१ ते २४ वयोगटातील युवक-युवतींनाही या योजनेचा लाभ घेता येणार असून, यासाठी वरणगांव नगरपरिषदेने पीएम इंटर्नशिप नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.या योजनेसाठी दहावी, बारावी, आयटीआय किंवा पदवीधर ही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत २६१ जागा उपलब्ध आहेत. इंटर्नशिपचा कालावधी १२ महिन्यांचा असून, या काळात दरमहा ५,००० रुपये मानधन, एकरकमी ६,००० रुपये आणि विमा सुविधा प्रदान केली जाणार आहे.नोंदणीसाठी इच्छुकांनी https://pminternship.mca.gov.in/login या संकेतस्थळावर १५ एप्रिल २०२५ पर्यंत आपली नोंदणी करावी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. संकेतस्थळावर अर्जासाठी लागणारी माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी वरणगांव नगरपरिषदेतील एनयुएलएम कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी सचिन राऊत यांनी केले आहे.“ही योजना युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. इच्छुकांनी वेळेत नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा,” असेही त्यांनी नमूद केले.