मोदींचा सल्ला आमदार गाठतील का पल्ला ?

0

मन की बात 

सामाजिक, राजकीय जीवनात काम करताना स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्या, दरवर्षी मेडिकल चाचणी करून घ्या. घरातील कुटुंबाकडे विशेष लक्ष द्या, सामाजिक जीवनात वावरताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. विधान परिषदेच्या आमदारांनी एखादा मतदारसंघ दत्तक घेऊन चांगले काम करावे. सरकारी अधिकाऱ्यांसोबत नम्रपणे बोला, बदली आणि दलाली कामापासून स्वत:ला दूर ठेवा. मतदारसंघात ज्यांनी तुम्हाला मतदान केले नाही त्यांच्यासाठी काम करून विरोधकांनाही आपलेसे करा. महायुतीतील एकोपा वाढवण्यासाठी आपले जे आमदार, पदाधिकारी आहेत त्यांच्या एकमेकांच्या कार्यालयांना भेटी द्या, गावोगावी डब्बा पार्टी आयोजित करा, लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपले सगळ्याकडे लक्ष असले पाहिजे असा वडिलकीचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत महायुतीच्या आमदारांची ‘शाळा’ घेवून दिला असून त्यांचा सल्ला विकासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी मतदारसंघातशी आपली नाळ जुडवून ठेवणे महत्वाचेच आहे. ‘खेड्याकडे चला’ असा नारा महात्मा गांधी यांनीही दिला होता. त्यामगचा उद्देश हा खेडी समुद्ध करण्यासाठी महत्वाचा मानला गेला.  मात्र कुणीही लोकप्रतिनिधी खेड्याकडे फिरकला नाही. आता पंतप्रधान मोदींनी आमदारांना कानमंत्र देतांना गाव दत्तक घेण्याचा सल्ला दिला आहे, यामागचा उद्देश दत्तक गाव स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल असा आहे.

सार्वजनिक जीवनात लोकप्रतिनिधींचे आचरण कसे असावे हेच मोदींनी आपल्या मार्गदर्शनातून अधोरेखित केले आहे. मात्र परिस्थिती वेगळीच आहे हे आपण जाणून आहोतच आजही बहुतांश आमदार मतदारसंघात जात नाहीत. काही काही महाभाग तर तब्बल पाच वर्षांनीच अवतरत असल्याचे किस्सेही भरपूर आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे होत असतांनाही अनेक गावांमध्ये आजही नागरी सुविधांची वानवा आहे. अनेक गाव-खेड्यांना जाण्यासाठी धड रस्ते नाहीत, नागरिकांना रोज या ना त्या समस्यांना तोंड द्यावे लागत असतांनाही आमदार महोदय मात्र आपल्याच तोऱ्यात हिंडत असतात. एकदाची निवडणुक संपली की ‘गरज सरो अन्‌ वैद्य मरो’ प्रमाणे त्यांना मतदारसंघाचे अन्‌ मतदारांचे काहीही देणे घेणे नसते. अशा लोकप्रतिनिधींसाठी मोदी साहेबांची ‘शाळा’ खऱ्या अर्थाने महत्वपूर्णच आहे. देव, देश अन्‌ समाज या त्रिसुत्रीवर भर असलेला मोदींचा हा सल्ला गाठण्यासाठी आमदारांना गाव-खेड्याच्या वेशीवर जावेच लागणार आहे. ‘

आमदारांनी समाजात वावरत असतांना स्वत:च्या प्रकृतीकडेही तितकेच लक्ष दिले पाहिजे, यासाठी योगा किंवा तत्सम व्यायाम करा, कुटुंबाकडे लक्ष द्या असा वडिलकीचा सल्ला मोदींनी दिला आहे. आमदारांनी विरोधकांना उत्तर देण्यापेक्षा कामातून उत्तर दिले पाहिजे हे अधोरेखित केले. कारण महाराष्ट्रात रोज वादावादीचेच राजकीय इमले रंगत असून त्यात विकासावर लक्ष केंद्रीत होत नाही. इतर राज्यात किंवा दुसऱ्या मतदारसंघात जर एखादी गोष्ट चांगली असेल तर त्याबाबत अभ्यास दौरा काढला पाहिजे हे सांगतांना त्यांनी चांगल्याला चांगले म्हणण्याची सवय लावली पाहिजे हे आमदारांच्या लक्षात आणून दिले. मोदींचा हा सल्ला मनावर घेवून सर्व आमदार कामाला लागतील अशी अपेक्षा करु या !

 

                    

दीपक कुलकर्णी

वरिष्ठ उपसंपादक

9960210311

Leave A Reply

Your email address will not be published.