मोदींच्या प्रतिज्ञापत्रामध्ये जशोदाबेन यांचे नाव !
पत्नीच्या संपत्तीचा दोन शब्दांत उल्लेख : तीन कोटीहून अधिक संपत्ती
वाराणसी, लोकशाही न्यूज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी वाराणसीमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजेच 1 जून रोजी मतदान होणार आहे. मोदींनी दाखल केलेल्या अर्जाबरोबर त्यांनी संपत्ती आणि खासगी माहिती देणारे प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे. यामध्ये मोदींनी त्यांची एकूण संपत्ती किती आहे यासंदर्भातील माहिती दिली आहे. शिक्षण किती झाले आहे, गुन्हेगारी प्रकरणा दाखल आहेत की नाही, वय, व्यवसाय यासारख्या तपशीलाबरोबर संपत्तीचे सविस्तर विवरण या प्रतिज्ञापत्रात देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रतिज्ञापत्रामध्ये मोदींनी पत्नी म्हणून जशोदाबेन यांचा उल्लेख करत त्यांच्या संपत्तीसंदर्भात दोन शब्दांमध्ये माहिती दिली आहे.
मोदींनी आपल्याकडे एकूण 3 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. पंतप्रधानांनी आपली एकूण संपत्ती 3 कोटी 2 लाख रुपये असल्याचे नमूद केले आहे. स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून आपल्याकडे 3.02 कोटींची संपत्ती आहे असे मोदींनी म्हटले आहे. यापैकी सर्वाधिक वाटा हा भारतीय स्टेट बँक म्हणजेच एसबीआयच्या खात्यात आहे. मोदींनी 2 कोटी 89 लाख 45 हजार 598 रुपये एसबीआयच्या फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत असे नमूद केले आहे. तसेच मोदींनी आपल्याकडे 52 हजार 920 रुपये कॅश असल्याचे सांगितले आहे. गांधीनगर आणि वाराणसीमध्ये आपली दोन बँक खाती असून त्यामध्ये 80 हजार 304 रुपये आहेत, अशी माहिती मोदींनी दिली आहे. मोदींकडे असलेल्या संपत्तीमध्ये 45 ग्राम वजनाच्या 4 सोन्याच्या अंगठ्याही आहेत. या सोन्याच्या अंगठ्यांची किंमत 2 लाख 67 हजार रुपये इतकी आहे. मोदींकडे 9 लाख 12 हजार रुपये हे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या माध्यमातून आहेत.
शिक्षण किती? व्यवसाय काय?
प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधानांविरोधात कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. तसेच कोणत्याही प्रकरणांमध्ये आपल्याला दोषीही ठरवण्यात आलेले नाही, असे मोदींनी सांगितले आहे. ते सरकारला कोणत्याही पद्धतीचे देणे लागत नाहीत, असे मोदींनी स्पष्ट केले आहे. शपथपत्रामध्ये पंतप्रधान मोदींनी आपण अहमदाबादचे रहिवाशी असून राजकारण हाच आपला व्यवसाय असल्याचे म्हटले आहे. या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, मोदींनी सन 1967 मध्ये एसएससीची परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी 1978 मध्ये दिल्ली विद्यापीठातून बीएची पदवी घेतली. तसेच 1983 साली त्यांनी गुजरात विद्यापीठातून एमएची पदवी घेतली.
जशोदाबेन यांचा उल्लेख
मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये पत्नी म्हणून जशोदाबेन यांच्या नावाचा उल्लेख आहे. जशोधाबेन यांच्याकडे सध्या किती संपत्ती आहे यासंदर्भातील माहिती देताना मोदींनी, ‘ठाऊक नाही’ अशी नोंद केली आहे. मोदी आणि जशोदाबेन एकत्र राहत नाहीत.
पूर्वी किती संपत्ती जाहीर केलेली?
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस गुजरातमधील गांधीनगरमध्ये एक जमीनीचा तुकडा, 1.27 कोटी रुपयांचे बचत खाते आणि 38 हजार 750 रुपये रोख रक्कम अशी एकूण 2.50 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. तर मोदींनी 2014 मध्ये एकूण संपत्ती 1.65 कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. पंतप्रधान मोदींची एक वेबसाईट असून फेसबुक, एक्स, युट्यूब, इंन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर ते सक्रीय असल्याचे सांगण्यात आले आहे.