लोकशाही न्युज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच युक्रेन दौरा केला. या दौऱ्यावेळी ते पोलंडहून नवी दिल्लीत येत असताना त्यांनी पाकिस्तानच्या एअरस्पेसचा, अर्थात पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला होता. पाकिस्तानी मीडिया आऊटलेट जियो न्यूजने विमान वाहतूक विभागाच्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
पाकिस्तान नागरी विमान वाहतूक विभागाशी संबंधित सुत्रांनी जियो न्यूजला दिलेल्या माहितीत सांगितले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान पोलंडहून नवी दिल्लीला येत असताना ते पाकिस्तानी हवाई हद्दीतून गेले. पंतप्रधान मोदींचे विमान चितराल मार्गावरुन पाकिस्तानी हवाई हद्दीत दाखल होत इस्लामाबाद आणि लाहोरवरुन पुढे गेले.
पंतप्रधान मोदी ज्या विमानातून पोलंडहून नवी दिल्लीला येत होते, त्या विमानाने सकाळी 10.15 वाजता पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला होता. पंतप्रधानांचे हे विमान 46 मिनिटे पाकिस्तानच्या हवाई हद्दीत होते. त्यानंतर 11 वाजून 1 मिनिटाने या हद्दीतून ते बाहेर पडत पुढे इस्लामाबाद आणि लाहोरच्या हवाई नियंत्रण क्षेत्रातून गेले.