लोकशाही न्यूज नेटवर्क
इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावाने बनावट खाते तयार करून तरुणाला भेटण्यासाठी बोलावले आणि त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. याप्रकरणी भूषण उर्फ बिस्ला राजू सावळे (वय २०) आणि सिद्धार्थ रामदास ढिवरे (वय २७, दोघे रा. फेकरी, ता. भुसावळ) यांना अटक करण्यात आली आहे. जुन्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता सरफराज सय्यद सकिर सय्यद (वय २४, रा. काझीपुरा, मुक्ताईनगर) याला ‘@ashwi_ni2083’ या इन्स्टाग्राम खात्यावरून तरुणीच्या नावाने मेसेज व कॉल करून वरणगाव येथील फुलगाव उड्डाणपुलाखाली बोलावण्यात आले. तेथे पोहोचताच आरोपींनी लोखंडी सळईने त्याच्या डोक्यावर व पायावर वार केले. त्यानंतर गावठी कट्ट्यातून दोन राऊंड गोळीबार करून ते पसार झाले. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पथकाने तपास सुरू केला. हल्ल्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांत बंद केलेल्या इन्स्टाग्राम खात्याचा तांत्रिक तपास करण्यात आला. आरोपी भूषणने अल्पवयीन मित्राच्या मोबाईलमधील ई-मेलचा वापर करून खाते चालवल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून दोघांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या चौकशीत १८ एप्रिल रोजी बोदवड-मुक्ताईनगर महामार्गावर झालेल्या अपघातानंतर आरोपी आणि सरफराज यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी आरोपींची गाडी फोडून त्यांना मारहाण करण्यात आली होती. या अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी हनीट्रॅपचा डाव आखल्याचे समोर आले. गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा मयत सागर कहार याने भूषणला दिला होता. सागरवर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल होते.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक संदिप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, दीपक जगदाळे, जितेंद्र वल्टे, संतोष पवार आणि सायबर पथकाने केली. आरोपींना पुढील कारवाईसाठी वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, गावठी कट्टा, मोटारसायकल व मोबाईलबाबत तपास सुरू आहे.

