चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृतीतून देत ग्लोबल वर्ल्ड असोसिएशनच्या वतीने भद्रावती येथील नागपूर हायवेलगत असलेल्या रिद्धी अपार्टमेंट परिसरात भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या सामाजिक उपक्रमाअंतर्गत कडुनिंब, अशोक, करंजी आणि पाम या विविध प्रजातींच्या ५० रोपांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, केवळ वृक्षारोपण न करता या सर्व रोपांच्या संगोपनाची व संरक्षणाची जबाबदारीही असोसिएशनने स्वीकारून पर्यावरणाप्रती आपली बांधिलकी स्पष्ट केली.
या हरित अभियानाचा शुभारंभ चंद्रकांतजी पुणेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जॉर्ज कुरियन यांनी, “पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. झाडे लावण्याइतकेच त्यांचे जतन आणि संगोपन करणेही अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन केले.
वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि घटते हरित क्षेत्र लक्षात घेऊन भविष्यातही अशाच पर्यावरणपूरक मोहिमा सातत्याने राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत अशा सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
या उपक्रमात ग्लोबल वर्ल्ड असोसिएशनचे अध्यक्ष नाना देवगडे, अनिल लभाने, कुंदन साहारे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले. सूत्रसंचालन युवराज सोनावणे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रकाश भारती यांनी मानले. “झाडे लावूया… झाडे जगवूया… हरित भविष्यासाठी आजच संकल्प करूया,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


