जळगाव ;- शहरातील पिंप्राळा परिसरातील रथ चौक परिसरात असलेल्या हनुमान व महादेव मंदिरातील दान पेटीवर परिसरातील चोरट्याने डल्ला मारला. ही घटना दि. ३१ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी संशयित अमर नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील पिंप्राळा परिसरातील रथचौकात मोहन रविंद्र बारी हा तरुण वास्तव्यास आहे. त्यांच्या घराजवळ हनुमान व महादेवाचे मंदिर असून त्याच्या पाठीमागे व्यायाम शाळा आहे, मोहन हा मित्रांसोबत त्याठिकाणी झोपण्यासाठी जात असतो. दि. ३० रोजी रात्री १२ वाजता मोहन हा मित्र शुभम राजपूत व दीपक कोळी असे तिघे जण व्यायाम शाळेत झोपण्यासाठी गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेच्या सुमारास आवाज आल्याने मोहन व त्याच्या मित्रांना जाग आली. त्यांनी बाहेर जावून पाहिले असता, त्यांना परिसरातील अमर नावाचा इसम मंदिरातून बाहेर पडत होता. त्याला आवाज दिला मात्र तो तेथून पळून गेला. दरम्यान, तिच तरुणांनी मंदिरात जावून पाहणी केली असता, मंदिरातील दानपेटी फोडलेली होती आणि त्यातील रोकड लांबविल्याचे दिसून आले. याप्रकरणी मोहन बारी याने दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.