आरोग्यास बहुगुणी व आरोग्यदायी अशी पिंपळी

0

लोकशाही विशेष लेख

मिरीप्रमाणे सरपटत जाणारा हा वेल आहे. जवळपास झाड मिळाले तर वर चढणारा वेल आहे. पाने ५ ते ७ सें. मी. लांबी असून त्यात ५ शिरा असात. फुले एकलिंगी व भिन्न वेलीवर असतात. कच्ची फळे हिरवी, पक्व फळे, लाल व सुकलेली फळे काळी असतात. त्यांना पिंपळी (Pimpli) किंवा लेंडीपिंपळी असे म्हणतात.

गुणधर्म

१) चव तिखट, २) पचनानंतर गोड, ३) रस तिखट, ४) वीर्य उष्ण नाही व शीत नाही असे मध्यम, ५) लघु, ६) स्निग्ध, ७) अग्निदीपक, ८) शुक्रधातुची शक्ती वाढवते, ९) बुद्धिवर्धक, १०) कफ व वात दोषशामक, ११) रसायनप्रमाणे कार्य करते. १२) वृष्य-संभोगशक्ती वाढवते.

उपयोगी भाग मूळ व फळ (पिंपळी, वाळलेली)

वापरण्याची पद्धत

१) चाटण – १ चमचा मधात पिंपळी पूड चिमूटभर टाकून त्याचे चाटण करतात
२) ताकात पिपळीचूर्ण टाकून पितात, ३) चौसष्ट पिंपळी व वर्धमान पिंपळी

आरोग्यासाठी फायदे

१) आवाज बसणे – थंडीमुळे आवाज बसतो तेव्हा एक चमचा मधात चिमूटभर पिंपळीचे चूर्ण टाकून त्याचे चाटण करावे.
२) उचकी – वरीलप्रमाणे चाटण करावे.
३) कफ, खोकला व दमा-सुरुवातीला सुका खोकला येतो. मग तो ओला होतो. त्या वेळी छातीत आवाज येतो. घशात खाकेरा असतो. त्याला इंग्रजीत कफ
म्हणतात. दमा हा बराच पुढचा विकार आहे. ज्यात श्वसनाला प्राणवायू पुरेसा मिळत नाही. हा विकार झाल्याचे लक्षात येताच एक चमचा मधात, चिमूटभर
पिंपळीचे चूर्ण टाकून त्याचे चाटण करावे. रोग पुढे सरकत नाही. दिवसातून तीन-चार वेळा चाटण द्यावे. या चाटण करण्यामुळे फुप्फुसाची शक्ती वाढते.
कफ सुटायला मदत होते.
४) ज्वर / ताप – जीर्णज्वर व अग्निमांद्य किंवा अजीर्ण या विकारात पिंपळीचे चूर्ण चिमूटभर व गूळ चार-पाच पट एकत्र मिसळून खावे. वर पाणी प्यावे रोज
दोनदा करावे यामुळे जुना ताप बरा होतो.
५) प्लीहा व यकृताला सूज-या दोन्ही अति महत्त्वाच्या ग्रंथींना सूज आल्यास त्यांचे कार्य मंद होते. अशा वेळी वर क्र.१ मध्ये दिल्याप्रमाणे पिंपळीचे चाटण
करावे. दिवसातून दोन-तीन वेळा करावे. यामुळे यकृत व प्लीहा या दोन्ही ग्रंथींची सूज ओसरते.
६) पोटफुगी व पोटदुखी-काही व्यक्तींना रोजच्या रोज पोट साफ होत नाही, शौचाला टणक खडा होतो. बराच जोर करावा लागतो. याला मलावरोध वा बद्धकोष्ठ असे म्हणतात. त्या माणसांना आतड्यात अन्न कुजत रहाण्याने विषारी वायू तयार होतात. त्यामुळे पोट फुगते व दुखायलाही लागते. अशा वेळी अर्धा भांडे ताक घेऊन (५० मि.लि.) त्यात चिमूटभर पिंपळीचूर्ण घालून व चवीला थोडे सैंधव घालून घोट घोट प्यावे. याने वायू सरतो व पोट साफ होते. या काळात पोटदुखी थांबते. भूक न लागणे – पिंपळी अग्निदीपक आहे. ती पचनसंस्थेवर प्रभावी कार्य करते. जठराग्नीची शक्ती वाढवते. अशा व्यक्तीला एक चमचा मधात चिमूटभर पिंपळीचे चूर्ण टाकून त्याचे चाटण करावे. एकदा केल्यानेही समस्या संपते.
८) स्त्री-रोग- गर्भवती स्त्री प्रसूत झाल्यावर तिला ताप येतो. त्याला प्रसूतिज्वर असे म्हणतात. त्याच वेळी गर्भाशय शुद्धीची गरज असते. या दोन्हीसाठी पिंपळीचे चूर्ण मधात मिसळून चाटण करतात.
९) चौसष्टी पिंपळी – उजाडल्यापासून मावळेपर्यंतचा दिवस चार प्रहरांचा असतो. तसेच रात्रदेखील चार प्रहरांची असते. म्हणजे सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतच्या एक पूर्ण दिवसाचे आठ प्रहर असतात. असे चौसष्ट प्रहर म्हणजे ८ दिवसपर्यंत सतत खलत रहाण्याने पिंपळीच्या चूर्णातील प्रत्येक कणाचा आकार अति सूक्ष्म होतो. हे सूक्ष्मत्व वाढल्याने तीक्ष्णत्वही वाढते. त्यामुळे चौसष्टी पिंपळीची गुणवत्ता वाढते. त्यामुळे हे चूर्ण अति थोड्या प्रमाणात देऊन कफ व वात विकारात जास्त फायदा होतो. निर्मितीसाठी वेळ जास्त लागत असल्याने चौसष्टी पिंपळी फार कमी ठिकाणी बनवली जाते. व ती त्यामुळे जास्त किंमतीला विकली जाते.
१०) वर्धमान पिंपळी – पिंपळी हे उत्तम रसायन द्रव्य आहे, त्याचे सर्व फायदे मिळविण्यासाठी वर्धमान पिंपळीचा प्रयोग केला जातो.

अ) पिंपळीची शुद्धी – पिंपळी शुद्ध करण्यासाठी ताकात बुडवून ठेवतात. रोज ताक बदलतात. आठव्या दिवशी पाण्याने धुवून वाळवतात. पुढील प्रयोगात अशा शुद्ध केलेल्या पिंपळ्या वापरतात.

ब) कृती – या प्रयोगात पिंपळ्यांची संख्या रोज वाढवायची व नंतर कमी करायची असते. ती रोज एक, तीन, सहा, किंवा दहा ने वाढवतात. जास्त संख्या असेल तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग करावा. सामान्य माणसांनी तब्येत चांगली रहाण्यासाठी, काय करावे ते पुढे दिले आहे. त्यामध्ये जुन्या, अनुभवी वैद्यांनी सांगितलेले बदल दिले आहेत. एक कप दूध व एक कप पाणी घेऊन त्यात ठेचलेल्या पिंपळ्या टाकायच्या. पहिल्या दिवशी एक पिंपळी टाकावी नंतर रोज एक पिंपळी वाढवून दहाव्या दिवशी दहा पिंपळ्या टाकायच्या. नंतर त्या रोज एक याप्रमाणे कमी करायच्या त्यात बिया काढलेल्या २० मनुका टेचून टाकायच्या. याने पोट साफ व्हायला मदत होते. नंतर त्यात चार साखरी खारकांचे तुकडे करून टाकायचे. याने पाय व पोटऱ्या दुखत नाहीत. तसेच त्यात चिंचोक्याइतकी सुंठपूड टाकायची. याने दूध पचायला हलके होते. आता हे मिश्रण मंद उष्णतेवर उकळत ठेवावे. सुमारे अर्धा तास उकळल्यावर मिश्रण फक्त एक कप रहाते. ते गाळावे. सुंठ व पिंपळ्या टाकून द्यायच्या. खारकेचे तुकडे व मनुका खायच्या. दूध पिऊन टाकायचे.

क) फायदे – पिंपळी हे रसायन असल्याने अकाली वार्धक्य येत नाही. म्हणजे केस पांढरे होणे, त्वचेवर सुरकुत्या येणे, शरीर पटकन थकणे इ. लक्षणे दिसत नाहीत. वृद्धपणीही सशक्त रहाता येते.

इ) काळजी – १ – पिंपळी उष्ण असल्याने पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी हा प्रयोग करू नये. २. वैद्यांच्या/ तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग करावा. ३) या एकोणीस दिवसांत रोज दूध, तूप, भात हाच आहार घ्यावा. व ४) ) दूध प्यावे. पाणी शक्यतो पिऊ नये.

सूचना

१) कफामुळे नाकाने श्वास घेणे शक्य होत नाही, तेव्हा पिंपळी वापरावी.
२) खाकेरा सुटत नसल्यास पिंपळीचा वापर करावा.
३) पिंपळी खूप कमी वापरावी, ती खूप उष्ण आहे हे लक्षात ठेवावे.

संतोष ढगे, सांगली
८२०८४२६४९४

Leave A Reply

Your email address will not be published.