पिंपळगाव हरेश्वर
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतातील कॉपर वायर, इलेक्ट्रिक मोटर, महावितरणच्या केबल तसेच सोलर केबल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि चोरीचा मुद्देमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी भंगार दुकानांची तपासणी करण्याची विशेष मोहीम राबविली. या कारवाईत चार भंगार दुकानांमधून एकूण ७५ हजार ४०० रुपये किमतीची कॉपर व अॅल्युमिनियमची तार जप्त करण्यात आली असून, चार जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ प्रमाणे चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली २९ सप्टेंबर रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरखेडी, भोकरी तसेच लोहारा दुरक्षेत्रातील कु-हाड गावातील भंगार खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. भोकरी येथील कलीम नबी काकर यांच्या भंगार दुकानातून ३२ हजार रुपये किमतीची ३२ किलो वजनाची कॉपरची तार, हकीम आब्याज काकर यांच्या दुकानातून १० हजार रुपये किमतीची १० किलो वजनाची कॉपरची तार, तर राजू उस्मान काकर यांच्या दुकानातून १ हजार ४०० रुपये किमतीची १४ किलो वजनाची अॅल्युमिनियमची तार मिळून आली. तसेच लोहारा दुरक्षेत्रातील कु-हाड गावातील अब्बुजर हकीम काकर यांच्या भंगार दुकानातून ३२ हजार रुपये किमतीची ३२ किलो वजनाची कॉपरची तार जप्त करण्यात आली.
सदर मुद्देमालाबाबत भंगार दुकानदारांकडे आवश्यक कागदपत्रे तसेच खरेदी-विक्रीचा पुरावा मागितला असता समाधानकारक माहिती व कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे वरील चारही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ प्रमाणे चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त मुद्देमालाचा चोरीच्या गुन्ह्यांशी संबंध आहे का, याबाबत तपास सुरू असून सखोल चौकशी करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव परिमंडळ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम, पाचोरा यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोहेकॉ अतुल पवार, पोहेकॉ अभिजीत निकम, पोना दीपक अहिरे, पोकाॅ प्रविण देशमुख, पोकाॅ भारत पाटील, पोकाॅ शाम हटकर, पोकाॅ मनोज बडगुजर व पोकाॅ नामदेव इंगळे सहभागी झाले होते.

