जिल्ह्याच्या सीमेवरुन अडीचशे वर्ष जुन्या शिलालेखाचे प्रथमच वाचन

पिंपळगाव हरेश्वरच्या दोन तरुणांचा संशोधनात समावेश ! : परिसराच्या इतिहासात पडली भर

0

पिंपळगाव हरेश्वर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथून जवळच असलेल्या एका महादेव मंदिरात अप्रकाशित शिलालेख आढळला असून त्यामुळे परिसरासह जिल्ह्याच्या इतिहासात भर पडली आहे. हा शिलालेख सोयगाव तालुक्यातील आंजोळा या सध्याच्या बेचिराख (उध्वस्त) गावात आढळला असून याच्या दक्षिण, पश्चिम व उत्तरेला सोयगाव तालुक्यातीलच अनुक्रमे तिडका, वाकडी व पोहरी बु. ही गावे असून पूर्वेला पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी हे गाव आहे. मंदिराच्या बाजूला व लगतच्याच परिसरात बेचिराख गावाचे अवशेष दिसून येतात.

पिंपळगाव हरेश्वर येथील वन्यजीव संशोधक व इतिहासप्रेमी असलेले विवेक वाघे व मनोज चव्हाण तसेच लातूर येथील इतिहास संशोधक कृष्णा गुडदे यांनी या शिलालेखाचे वाचन आणि त्याचा अर्थ लावला असून हा शिलालेख 240 वर्ष जुना असल्याचे त्यांनी सांगितले. शिलालेखाची भाषा मराठी आणि लिपी देवनागरी असून त्याची तारीख पिल्ले जंत्रीनुसार 02 डिसेंबर 1785 वार शुक्रवार येत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

मंदिराचे प्रवेशद्वार म्हणजे साधारण चार फुट उंचीच्या तीन कमानी असून मधल्या कमानीत नंदी विराजमान आहे. कमानीतुन आत गेल्यावर गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी साधारण अडीच फुट उंचीचे आयताकृती प्रवेशद्वार असून ललाटबिंबावरच्या एका आडव्या शिळेवर शिलालेख कोरलेला दिसून येतो. गाभाऱ्यात महादेवाची पींड असून समोरच्या भींतीवर अश्वारुढ योद्धयाची मुर्ती कोरलेली दिसून येते. मुख्य मंदिरालाच लागून उजव्या बाजूला असलेल्या गाभाऱ्यात मोठ्या शिळेवर हनुमानाची मुर्ती कोरलेली असून बाहेरील बाजूस वानरांच्या मुर्ती कोरलेल्या आढळून येतात. मुख्य मंदिर संपूर्णपणे दगडात बांधलेले असून मंदिराची शैली मराठा कालीन वाटते. अलीकडे बाहेरील बाजूस नव्याने सभामंडप बांधलेला दिसून येतो.

शिलालेखात उल्लेख आलेल्या शिवाजी निकम-पाटील यांचे वंशज जवळच असलेल्या वाकडी या गावात राहतात. याच गावात दगडी बांधकाम केलेल्या 9 समाध्या होत्या; पैकी 3 समाध्या अलीकडेच नष्ट झाल्या असून सध्या गावात 6 समाध्या आढळून येतात. या सहा समाध्यांपैकी एक समाधी शिवाजी निकम-पाटलांची असल्याचे गावकरी सांगतात. ही समाधी आकाराने मोठी, आकर्षक नक्षीकाम असलेली असून ज्याच्या कळसाचे काम चुन्याचे असून उर्वरित काम दगडी आहे. एकूणच बांधकाम शैलीवरुन ही समाधी मराठा कालखंडातील वाटते.

जिल्ह्याच्या सीमेवर अप्रकाशित शिलालेख आढळल्याने व त्याचे वाचन करून अर्थ लावल्याने परिसराच्या इतिहासात भर पडली असून सदर गावासह परिसराच्या अधिक अभ्यासाची गरज असल्याचे विवेक वाघे व मनोज चव्हाण यांनी सांगितले. या कामात पंकज माहुरे, नरेंद्र देशमुख, मुकेश झेरवाल आणि जितेंद्र बडगुजर यांचे सहकार्य लाभले.

 

शिलालेखाचे वाचन 

ओळ 1 सके १७०७ विस्वावसु ना

ओळ 2 म संवतसरे मारगेस्वर सु

ओळ 3 ध १ सिवाजी निकम पा|मन

ओळ 4 ना वादका रिगू दयाराम पाया

 

शिलालेखाचा अर्थ

शके 1707 विश्र्ववसू नाम संवत्सर मार्गेश्वर शुध्द 1 (म्हणजेच 2 डिसेंबर 1785, वार शुक्रवार रोजी) शिवाजी निकम पाटील यांच्या पाटीलकीत मनना वादक (वादन करणारा), रिगु दयाराम यांनी या मंदिराचा पाया घातला (रचला).

Leave A Reply

Your email address will not be published.