जिल्ह्यात पिक विम्याचे 34 हजार अर्ज बोगस ?
शेतकऱ्यांच्या नावाखाली लूट : योजना बंद करण्याची आयुक्तांची शिफारस
लोकशाही विशेष लेख
राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणारी ‘एक रुपयातील पीकविमा योजने’त मोठ्या प्रमाणावर घोटाळा होत असून जळगाव जिल्ह्यात तब्बल 33 हजार 786 अर्ज बोगस असल्याची माहिती समोर आली आहे. बोगस अर्जाच्या माध्यमातून शासनाची लूट केली जात असल्याचे समोर आले असून ही योजना बंद करण्याची शिफारस कृषी आयुक्तांनीच सरकारकडे केली आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळावे यासाठी सरकारने ‘एक रुपयात पिक विमा’ ही महत्वाकांक्षी योजना अंमलात आणली होती; परंतु या योजनेत सामूहिक सेवा केंद्राचे (सीएससी) चालक परस्पर शेतकऱ्यांचे अर्ज दाखल करीत असल्याचे समोर आले आहे. या योजनेअंतर्गत केले जाणारे बोगस अर्ज आणि गैरव्यवहार लक्षात घेता ही वादग्रस्त ठरलेली योजना बंद करावी, अशी शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनेच सरकारला केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच ओडिशा सरकारने शेतकऱ्यांना केल्या जाणाऱ्या मदतीमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे समोर आल्यानंतर एक रुपयात विमा देण्याची योजना बंद केली होती. त्याच पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महायुती सरकारकडून असाच निर्णय घेतला जातो का या विषयी किंतुपरंतु व्यक्त होत आहे.
हिवाळी अधिवेशनात भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी एक रुपया पीकविमा योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. ओडिशामध्येही एक रुपयात पीकविमा योजना राबविण्यात आलेली. या राज्यामध्येही शेतकऱ्यांच्या नावावखील पैसे लुबाडण्यात आले आणि या योजनेअंतर्गत मोठा भ्रष्टाचार होऊ लागल्यानंतर योजना बंद केली गेली. महाराष्ट्रातील कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही ओडिशातील या निर्णयाचा संदर्भ देत असाच निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे. बनावट अर्जांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी एका अर्जापोटी शेतकऱ्याने किमान शंभर रुपये भरावेत, असेही समितीने सुचविले आहे.
सेवा केंद्रचालकांना मिळतो मेवा
खरीप 2024 मध्ये एकूण 4 लाख 5 हजार 553 अर्ज बोगस असल्याची माहिती कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मध्यंतरी दिली होती. राज्य सरकारने एक रुपयात पीकविमा योजना सुरू केल्यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्याला माहिती न देता पैसे लुबाडण्याचे प्रकार सुरु आहेत. शेतकऱ्याच्या नावावर परस्पर सामूहिक सेवा केंद्राचे (सीएससी) चालक पीकविम्यासाठी अर्ज करीत असल्याचे समोर आले आहे. एक अर्ज करण्यासाठी एक रुपयाचा खर्च आहे, तर एक अर्ज केल्यापोटी सामूहिक सेवा केंद्रचालकांना 40 रुपये मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा विमा काढल्याचे प्रकारही समोर आले. सर्वाधिक बोगस अर्ज हे सामूहिक सेवा केंद्र चालकांकडून करण्यात आले आहेत.
अशी आहेत बोगस अर्जांची आकडेवारी
बीड – 1 लाख 9 हजार 264, सातारा – 53 हजार 137, जळगाव – 33 हजार 786, परभणी – 21 हजार 315, सांगली – 17 हजार 217, अहिल्यानगर – 16 हजार 864, चंद्रपूर – 15 हजार 555, पुणे – 13 हजार 700, छत्रपती संभाजीनगर 13 हजार 524 अर्ज बोगस असल्याची माहिती समोर आली आहे.
दीपक कुलकर्णी
वरिष्ठ उपसंपादक
9960210311