शारिरीक, मानसिक स्वास्थ हीच जीवनाची गुरुकिल्ली!
महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांचे प्रतिपादन : लोकशाहीच्या ‘लोकारोग्य’ विशेषांकाचे प्रकाशन
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिवसेंदिवस वेगवेगळे आजार डोके वर काढत असून त्यावर मात करण्यासाठी आध्यात्मिक शांतीसोबत शारिरीक, मानसिक स्वास्थ आवश्यक असून तीच सुखी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी केले. दै. लोकशाहीच्या ‘लोकारोग्य’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील, आनंद हॉस्पीटलचे संचालक डॉ. अमित भंगाळे, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर, लोकशाहीचे संचालक राजेश यावलकर, शुभांगी यावलकर, सल्लागार संपादक धों.ज.गुरव, वरिष्ठ उपसंपादक दीपक कुलकर्णी उपस्थित होते. प्रास्ताविक राजेश यावलकर यांनी तर अंकाची माहिती धों.ज.गुरव यांनी दिली.

महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज म्हणाले की, लोकशाहीचा हा विशेषांक म्हणजे आरोग्यासाठी मल्टीस्पेशालीस्ट आहे. निरोगी आरोग्यासाठी अंकाचे वाचन करणे गरजेचे आहे. जो अंक वाचेल तो नक्कीच ‘वाचेल’ असे सांगत त्यांनी अंकाचे तोंड भरुन कौतुक केले. जीवनात स्वास्थ महत्वाचे आहे. निरोगी आयुष्य जगण्याला महत्व आहे, नको त्या बाबींना जास्त महत्व देवू नका, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रांची आरोग्याच्या बाबतीत पुढे येवून समाजाची सेवा करावी असे आवाहन केले.

यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील, आनंद हॉस्पीटलचे संचालक डॉ. अमित भंगाळे, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर, कवी आर.डी. कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. या सोहळ्याला जाहिरात व्यवस्थापक विवेक कुलकर्णी, सुरेश सानप, मुबारक तडवी, ललित कोळी, मोहन पाटील, भूषण परदेशी, गौरव पाटील, संजय सुतार, पंकज गवळी, कवी आर.डी. कोळी, गोविंद पाटील, निंबा बडगुजर उपस्थित होते. आभार दीपक कुलकर्णी यांनी मानले.