महिलेच्या पर्समधून ५० हजारांची रोकड लंपास
जळगाव: शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून ५० हजार रुपयांची रोकड चोरीला गेली. ही घटना बुधवार, १२ मार्च रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर येथील अरुणा आनंदराव महाडिक (वय ५५) या महिलांनी फुले मार्केट येथे खरेदीसाठी भेट दिली होती. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील ५० हजार रुपये लंपास केले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश पाटील करत आहेत. बाजारपेठेत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांना अधिक सावधान राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


