मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
वाढत्या महागाईच्या काळात मोठा दिलासा मिळू शकतो. भारतात आयात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतीत गेल्या पाच वर्षांतील सर्वात मोठी घसरण झाली आहे. भविष्यात पेट्रोल डिझेलचे दर होण्याची शक्यता आहे. सध्या प्रति बॅरल सरासरी खर्च ७० डॉलर्सच्या खाली गेला असून, २०२१ नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलासाठी इतका कमी दर मोजावा लागत आहे. यामुळे लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शुक्रवारी कच्च्या तेलाच्या आयातीचा सरासरी खर्च प्रति बॅरल $६९.३९ होता. हे दर एप्रिल २०२३ मधील $८९.४४ च्या तुलनेत २२ टक्क्यांनी कमी झाले आहेत. सोमवारी ब्रेंट क्रूडची किंमत $६५च्या खाली गेल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो. जागतिक विकासातील मंदी आणि ट्रेड वॉरमुळे मागणीत घट झाल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गोल्डमॅन सॅक्सने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या वर्षी सरासरी कच्च्या तेलाची किंमत ६३% प्रति बॅरल राहू शकते. दुसरीकडे ओपेकने आपल्या अहवालात म्हटले की, २०२५ आणि २०२६साठी तेलाच्या मागणीचा अंदाज दररोज १ लाख बॅरलने कमी करण्यात आला आहे. यामुळे दरवर्षी सुमारे १% मागणीत घट होण्याचा अंदाज आहे.
७ एप्रिल रोजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की, तेल कंपन्यांकडे ४५ दिवसांचा साठा होता, त्यांनी त्यावेळी प्रति बॅरल $७५ ला खरेदी केली होती. मात्र, आता किंमत $६० ते $६५ डॉलर्सपर्यंत घसरल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.