नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशात दिवसेंदिवस महागाई (inflation) वाढतच आहे. इंधनासह जीवनावश्यक वस्तू महाग झाल्याने सामान्य जनता होरपळून निघत आहे. मात्र आता सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
शनिवारी विमान इंधनाच्या (ATF) किमती 2 टक्क्यांहून अधिक कमी झाल्या. दुसरीकडे, कच्च्या तेलाचा (Crud Oil) भाव अनेक दिवसांपासून प्रतिबॅरेल 100 डॉलरच्या आसपास आहे. गेल्या आठवडाभरापासून त्याचे दरही कमी होताना दिसत आहेत. अशा स्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही घट होण्याची शक्यता आहे.
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कच्चे तेलाचे दर 100 डॉलरच्या जवळ राहिले तर पेट्रोल डिझेलचे दर आणखी कमी होऊ शकतात. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या सततच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर, सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दरही जाहीर केले आहेत, ज्यामध्ये रविवारीही कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. 6 एप्रिलपासून कंपन्यांनी त्याच्या किमती वाढवल्या नाहीत, तर क्रूडच्या किमती एकदा प्रति बॅरल 140 डॉलरच्या वर गेल्या होत्या. आता क्रूड 100 डॉलरच्या जवळ असताना, आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

