राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते दीपक दिलीप जगदेव यांच्या वतीने वकील नितीन सातपुते यांनी ही याचिका दाखल केली आहे.

यामध्ये विद्यमान राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा अवमान केल्याचे म्हटले आहे. लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याचिकेत घटनेच्या कलम 61 आणि 156 अंतर्गत महाभियोगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराज हे ‘जुन्या दिवसांचे’ प्रतीक होते.

कोश्यारींच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात राजकीय खलबते सुरूच आहेत. महाराष्ट्रासाठी नवीन राज्यपालाची नियुक्ती करावी, असे मत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांवर भाष्य केल्याबद्दल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून हटवावे. नांदेडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यपालांविरोधात केलेल्या आंदोलनानंतर चव्हाण पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP), काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि इतर संघटनांचे कार्यकर्ते कोश्यारी यांची पदावरून हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी निषेध करत आहेत. राज्यपालांनी असे वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नसून घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे अशोभनीय असल्याचा दावा चव्हाण यांनी केला. कोश्यारी यांची महाराष्ट्राबाहेर बदली करावी आणि राज्यासाठी नवीन राज्यपालाची नियुक्ती करावी, असे काँग्रेस नेते म्हणाले. चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राचा अवमान कोणत्याही प्रकारचा खपवून घेतला जाणार नाही.

दरम्यान, राज्यपालांना राष्ट्रपतींनी परत बोलावण्याची मागणी करत औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहरातील क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार कल्याण काळे म्हणाले, कोश्यारींना राष्ट्रपतींनी परत बोलावले पाहिजे.छत्रपती शिवाजीची तुलना कोणाशी करायची हे राज्यपालांना कळत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.