रथोत्सव व यात्रोत्सव उत्साहात व शांततेत पार पाडा
सहकार्य करण्याचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांचे आवाहन : यंदाचे रथोत्सवाचे २८० वे वर्ष
शेंदुर्णी ता. जामनेर
खान्देशचे प्रति पंढरपुर नगरी असलेल्या शेंदुर्णी येथील संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांनी प्रारंभ केलेला विठ्ठल रुक्मिणी रथोत्सव शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यंदाचे रथोत्सवाचे २८० वे वर्ष आहे. नदी काठावर १५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर अशी १५ दिवस भव्य यात्रा भरणार आहे. सध्या आचारसंहिता सुरू आहे. तेव्हा हा उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडावा असे आवाहन शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी केले आहे.
अतिशय प्राचीन व पावणे तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या शेंदुर्णी नगरीत रथोत्सव व यात्रोत्सवा निमित्ताने खान्देश मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. नगरपंचायत प्रशासनाने रथमार्गावर डागडुजी केली असुन सुलभ दर्शन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. सोन नदीच्या काठावर या निमित्ताने भव्य यात्रा भरणार असुन व्यावसायिक, दुकानदार, मनोरंजनाचे खेळ रहाट पाळणे हॉटेल्स, सर्व प्रकारची दुकाने लोकनाट्य मंडळ, टुरिंग टॉकीज सर्वांनी यात्रेसाठी यावे तसेच व्यावसायिक यांनी आरक्षणासाठी नगरपंचायत कार्यालय शेंदुर्णी येथे संपर्क साधावा. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच आवश्यक त्या सुविधा सुद्धा पुरविण्यात येत आहे.
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागु आहे. तेव्हा कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सगळ्यांनीच सहकार्य करावे असे आवाहन शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी केले आहे.