जळगाव
सध्याचे राजकारण वेगळ्या वळणावर गेले असून सर्वसामान्य नागरिकांना राजकारण्यांचा तिटकारा येत आहे. पूर्वी जिद्दी लढणारे लोक राजकारणात होते त्यामुळे विकासाला चालना मिळाली, मात्र जिद्दीने लढणारे लोक राजकारणातून बाद झाल्याने विकासाला खीळ बसली आहे अशी खंत ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी व्यक्त केली. एका पत्रकार परिषदेच्या निमित्ताने ते माध्यमांशी बोलत होते.
आगामी काळात होवू घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना राजकीय समीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी राजकारणातून निवृत्त झालो आहे. प्रत्येकाला आशिर्वाद देणे ऐवढेच काम सध्या माझ्याकडे आहे. जळगाव शहराचा विकास गेल्या 20-25 वर्षांत खुंटला आहे. राजकारणात सेवाभावी वृत्तीच्या लोकांना पाठींबा देणे म्हणजेचे विकासाला चालना देणे असे आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर अप्रिय घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. भ्रष्ट राजकारणी असले तर प्रशासनावर त्यांचा वचक राहत नाही. चांगले लोक राजकारणाला दिशा देवू शकतात; मात्र गेल्या काही वर्षात भ्रष्ट, गुंड, वाळू माफिया यांचा राजकारणात शिरकाव झालेला असल्याने त्यांचे उद्देश वेगळे आहेत.
या साऱ्यांचा विकासावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असल्याने नागरिक मुलभूत सुविधांना मुकत आहेत. पूर्वी सेवा, समर्पण आणि विकास या त्रिसुत्रीवर राजकारण करणारी जिद्दी माणसे होती ती आता दिसत नाहीत. जळगाव शहरात 24 तास शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी योजना आपल्या काळात तयार झाली मात्र त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष न दिसल्याने नागरिकांना पाण्यासाठी ‘वाट’ पाहवी लागत आहे. शहरातील रस्ते, व्यापारी संकुल यांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने आगामी काळात सेवाभावी वृत्तीच्या लोकांना पाठींबा देणे अधिक उचित होणार असल्याचेही सुरेशदादा जैन यांनी सांगितले.
नितीन लढू नकोस!
मध्यंतरीच्या काळात माजी महापौर नितीन लढ्ढा आशिर्वाद घेण्यासाठी आले असता त्यांना सल्ला दिली की, तूू निवडणूक लढू नको आणि लढवयाची असल्यास ‘वेगळा’ निर्णय घेवून मैदानात उतरशील. सध्याचे राजकारण हे सुड, कपट, दडपशाहीचे झाले असून यात कामे करणाऱ्या माणसांना अडकविले जाते अशी खंतही सुरेशदादा जैन यांनी व्यक्त केली.

