पाणीसाठा उपलब्ध मात्र नियोजनाचा दुष्काळ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पेण –  संपूर्ण महाराष्ट्र पाण्याअभावी दुष्काळात होरपळत आहे , तर पेण तालुका मात्र भरपूर पाण्याची उपलब्धता असताना नियोजनाच्या दुष्काळामुळे पाण्याअभावी होरपळत असल्याचे चित्र दिसत आहे .

तिसरी मुंबई म्हणून पाहिले जात असलेल्या पेण तालुक्यात नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे हेटवने सारखे मुबलक पाणीसाठा असणारे धरण आहे . आकाराने छोटे असलेले आंबेगाव धरणात  देखील मुबलक पाणीसाठा वापर न होताच पडून आहे तर दुसरीकडे शिर्की , वाशी या दोन खारेपाट विभागातील जनतेला पाणी पुरवठा करणारे शहापाडा धरण असून मार्चमध्येच यातील पाणीसाठा कमी होत असल्याने या दोन्ही खारेपाट विभागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे .

पेण तालुक्यातील शिर्की विभागातील बोरी , शिर्की, शिर्की चाळ, शिर्की चाळ नं . १ , २ बोर्वे , मसद , मसद बेडी, सागर वाडी , दरबार वाडी , शिंगणवट , भोई कोटा ,बेणेघाट , सरेभाग या गावांबरोबर वाशी विभागातील वाशी , कणे , बोरझे , वढाव , मोठे वढाव , दीव , काळेश्री ,भाल , मोठे भाल ,  नारवेल , ठाकूरबेडी , आदी गावांना शहापाडा धरणातून पाणी पुरवठा केला जातो . मात्र शहापाडा धरणातील पाणीसाठा मार्च महिन्या पासून कमी होत असल्याने या गावांतील हजारो कुटुंबांना मार्च महिन्यापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागतो .पेण तालुक्यासाठी पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी आरक्षित असतांना शासनाच्या नियोजना अभावी तालुक्यात दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होते .

14 फेब्रुवारी 2016 मध्ये तत्कालीन आमदार धैर्यशील पाटील यांचे नेतृत्वाखाली पेण ते मुंबई पायी संघर्ष यात्रा काढण्यात आली होती ,यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेटवणे ते वाशी, शिर्की पाणीपुरवठा योजनेसाठी   एमएमआरडीए च्या माध्यमातून अडतीस कोटी रुपये निधी दिला. त्यानंतर ही योजना सुरु देखील झाली मात्र राज्यकर्त्यांची कमजोर मानसिकता व प्रशासनच चालढकल पणा यामुळे ही योजना अद्याप अपूर्ण आहे.

1 कोटी 25 लाखांचा आराखडा

टंचाई ग्रस्तगावांना पाणी पुरवठा करण्यासाठी पेण पंचायत समिती मार्फत  दरवर्षी प्रमाणे कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. टंचाई ग्रस्त शेकडो गाव वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी एक कोटी 25 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये टँकर ने पाणीपुरवठा करण्यासाठी 65 लाख रुपयांचा समावेश आहे.इतर निधी हा विहीर दुरुस्ती, इंधन विहिरी यासाठी करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.