Thursday, August 11, 2022

ढगाळ वातावरण अस्थमा रुग्णांसाठी धोकादायक !

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पेण ; गेले ३ दिवस पेणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. या  ढगाळ वातावरणामुळे अस्थमा रुग्णांना त्रास जाणवतो आहे. वातावरणातील ओलसरपणा आणि विषाणू संसर्गामुळे हा त्रास अधिक होतो. दिवसभर ढगाळ वातावरण अस्थमा रुग्णांसाठी धोकेदायक असून त्यांनी अधिक काळजी घेण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.

बदललेल्या वातावरणामुळे ताप, थंडी, सर्दी व खोकला याची साथ पसरली आहे. या वातावरण बदलाचा सर्वाधिक त्रास अस्थमा रुग्णांना होतो. सध्याच्या काळात सूर्यप्रकाश कमी येतो. त्यामुळे रोगराईला कारणीभूत ठरणारे जीवजंतू वाढतात. त्यामुळे संसर्गाचे प्रमाणदेखील वाढते. या काळात सर्दी-खोकला वाढतो. अनेकांना आधीच अस्थमा असल्यास त्यांना त्रास वाढतो. लहान मुलांमध्येदेखील बालदम्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ज्यांना दम्याचा त्रास आहे. त्यांनी काळजी घेणे गरजेचे असते.

अनेकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अन्य व्याधी याच काळात जडतात. अस्थमाचे जे रुग्ण आहेत, त्यांना सध्या त्रास वाढल्याचे दिसत आहे. रुग्णालयातही अशा रुग्णांची संख्याही वाढलेली दिसून येते. ढगाळ वातावरणामुळे अस्थमा रुग्णांना ॲलर्जी, रिॲक्शन येणे असा त्रास होत आहे. त्यात दम्याचे प्रमाणही वाढत आहे. सध्या व्हायरल इन्फेक्शनसुद्धा आहे. त्यामुळे इतर जंतूंचे प्रमाण या रुग्णांवर लवकर प्रभाव करतात. त्यामुळे रुग्णांनी वेळीच उपचार घेणे, हाच उत्तम पर्याय असल्याचे डाॅक्टर सांगतात.

बालकांनाही अस्थमाचा त्रास

बदलत्या वातावरणामुळे वयोवृद्धांसह युवक व लहान मुलांनाही अस्थमाचा त्रास जाणवत आहे. बालकांना आधी सर्दी-खोकला होतो, मग दम लागतो. अशा स्थितीत थंड वातावरण, पावसात भिजणे, थंड पदार्थ खाणे टाळावे, तसेच उग्र वासापासून मुलांना दूर ठेवावे, असे उपाय करावे. गरज असल्यास वैद्यकीय सल्ला आणि उपचार घ्यावे.

अशी घ्यावी काळजी

– थंड वातावरणात जाऊ नये.

– तोंडाला मास्क लावावे.

– डॉक्टरांनी दिलेली औषधी जवळ बाळगावी.

– पंप किंवा नेब्युलायजर नेहमी जवळ ठेवावे.

– रोगप्रतिकारक शक्तीसाठी पौष्टिक आहार घ्यावा.

– तेलकट व मसालेयुक्त जेवण टाळावे.

– तसेच संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी.

ज्यांना काही आजार नाही, त्यांनाही वारंवार सर्दी, न्यूमोनिया सध्याच्या वातावरणामुळे होऊ शकतो. धुळीपासून दूर राहणे, सर्दी झाल्यास साध्या पाण्याची वाफ घ्यावी. नेब्युलायजर मशीनने डॉक्टरांनी सांगितले असेल तरच वाफ घ्यावी. अस्थमा किंवा हृदयरोगाचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

– डॉ. संदीप चौधरी, बीएएमएस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या