अवकाळी पाऊस : वीज पडून नातवाचा मृत्यू, आजोबा गंभीर जखमी
जळगाव तालुक्यातीलधानवड येथील घटना
जळगाव: लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव तालुक्यातील धानवड परिसरात सोमवारी रात्री अवकाळी पावसासह विजांचा कडकडाट झाला. याचदरम्यान वीज कोसळून अंकुश विलास राठोड (१५, रा. धानवड) या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे आजोबा शिवाजी जगराम राठोड (६५) गंभीर भाजले. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंकुश राठोड हा रोजच्या प्रमाणे आजोबा शिवाजी राठोड यांच्यासोबत शेतात पिकांची राखण करण्यासाठी गेला होता. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक विजांसह जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी धानवड ते भवानी खोरा रस्त्यालगत असलेल्या शेतात वीज कोसळली. यात अंकुशचा जागीच मृत्यू झाला, तर आजोबा शिवाजी राठोड गंभीर भाजले.
घटनास्थळी आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत कुटुंबीयांना माहिती दिली. नागरिकांनी तत्काळ दोघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच अंकुशचा मृत्यू झाला होता. शिवाजी राठोड यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीकडे कुटुंबीय आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर राठोड कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. जिल्हा रुग्णालयात कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणात आक्रोश व्यक्त केला. अवकाळी पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी केली जात आहे.