मन की बात
पत्रकारिता ही कोहीनूर हिऱ्यापेक्षाही मौल्यवान आणि तलवारी पेक्षा धारधार मानली जाते. समाजात पत्रकारिता ही तिसऱ्या डोळ्याची भुमिका बजावित असते. पत्रकारिता समाज घडविण्याचे व राष्ट्रहीत जपण्याचे मोठे साधन आहे. दि. 6 जानेवारीला पत्रकार दिवस साजरा केला जातो. हा दिवस आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जात असतो. स्व. जांभेकरांचे काही तत्व होते सत्तेच्या विरोधात लिखान करणे. कारण हे लिखाण सत्तेच्या विरोधात नसून सत्ताधाऱ्यांच्या चुकांमध्ये दुरूस्ती करणे होय. जोपर्यंत पत्रकार सत्तेच्या विरोधात लिहिणार नाही तोपर्यंत देशात काय सुधारणा करायची आहे हे कदापि लक्षात येणार नाही. त्यामुळे सरकारच्या चुका लेखणीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवून सरकारचे डोळे उघडण्याचे काम पत्रकारांमार्फत व्हायला पाहिजे. म्हणून जांभेकर म्हणतात सत्ताधाऱ्यांनी पत्रकारांचे कौतुक नव्हे, उलट शिव्या घातल्या तर खऱ्या पत्रकारितेची पावती मिळते असे ते मानत असे.
जगात पत्रकारितेला मोठे महत्व आहे. त्यामुळे पत्रकारितेला चौथास्तंभ ही उपमा दिली आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, राजकीय हालचाली, जिल्हास्तरीय, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत संपूर्ण माहिती 135 कोटी जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून होत असते. पत्रकारिता मध्यस्थीतीची भुमिका हाताळीत असते; तेव्हाच आपल्याला समाजातील समतोलता दिसून येतो. या समतोलतेचे दायीत्व पुर्णपणे पत्रकारितेवर अवलंबून असते व पत्रकार आपली जबाबदारी मोठ्या शिताफीने पार पाडतो. प्रत्येक बाब जनतेच्या हितासाठी असावी या उद्देशाने प्रत्येक गोष्ट जनतेच्या हितार्थ प्रकाशित केली जाते. पत्रकारितेचे अनेक तत्व आहेत. लिखाण, समाजातील घडामोडींवर नजर ठेवून माहिती एकत्र करणे, कॅमेरात कैद करणे व ती पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचविणे. आजच्या आधुनिक युगात वर्तमानपत्र, रेडिओ, दूरदर्शन, वेब-पत्रकारिता, मिडिया, फेसबुक, सोशल मीडिया, ई-पत्रकारिता यांच्या माध्यमातून पत्रकारितेची भुमिका मोठ्या प्रमाणात बजावली जात आहे.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार नेहमीच जीवाची बाजी लावत ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन करीत दिवसरात्र धावपळ करीत असतात. गेल्या वर्षभराच्या कालावधीत दोन मोठ्या निवडणुका पार पडल्या. सणोत्सव आटोपल्यावर विविध धर्म, जात, शासकीय, निम शासकीय कार्यालयातर्फे क्रिकेटसह इतर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सर्वच आपला विचार करतात मात्र पत्रकारांचा कुणीही विचार करत नाही हे काही तरुण पत्रकारांनी हेरले आणि आपल्या पत्रकार बंधूंसाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करावे असा विचार पुढे आला. अनेक पत्रकारांमध्ये या ना त्या कारणांनी मतभेद, मनभेद निर्माण झालेले असतात ते अशा स्वरुपाच्या स्पर्धांच्या माध्यमातून ‘बाद’ करण्याचा या स्पर्धेमागील मुळ हेतू होता. जळगाव जिल्ह्यातील पत्रकार बंधूंनी या स्पर्धांना जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तो खरोखरच ‘आनंदी आनंद गडे’ असा होता.
पत्रकार प्रीमियर लीग आयोजित करण्यामागली खरा उद्देश हा पत्रकारांमधील सुसंवाद, खेळण्याची वृत्ती आणि मैत्री वाढीस लागावी हा होता आणि तो उद्देश उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सफल झाला असे म्हणण्यास काही एक हरकत नाही. या स्पर्धेत जिल्ह्यातील पत्रकारांचे 14, जळगाव शहरातील 5 संपादक असे एकूण 20 तर लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासनाचा संघ असे 24 संघ सहभागी झाले होते. ह्या स्पर्धांसाठी चेतन वाणी, वाल्मिक जोशी, किशोर पाटील, जकी अहमद, वसीम खान, सचिन गोसावी यांनी कठोर परिश्रम घेतले. या स्पर्धेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, आमदार राजूमामा भोळे यांनी सहभाग घेत पत्रकारांचा आनंद द्विगुतीत केला. पत्रकारांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेली ही स्पर्धा खऱ्या अर्थाने एकतेचे प्रतिक ठरली !

मो. ९९६०२१०३११