चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
पाटणा देवीच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर चंदन तस्करी होत असून चोरी करणाऱ्या अकरा जणांच्या टोळीला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. मात्र यात सात जण पसार झाले तर दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चंदनाची झाडे तोडण्याचे साहित्य व १३ किलो चंदन जप्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा देवीच्या जंगलात चंदनाची झाडे तोडली जात असल्याने वन कर्मचाऱ्यांनी चोख पहारा दिला होता. शुक्रवारी (ता. १३) मध्यरात्रीच्या सुमारास जंगलात वनरक्षकांसह वन मजूर गस्त घालत असताना त्यांना झाडे तोडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने वन कर्मचारी गेले असता आठ जण तीक्ष्ण हत्यारांनी चंदनाची झाडे तोडताना दिसले.
दरम्यान त्यांच्याजवळ जाताच सहा जण अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेले. दोघा चंदन चोरांना पकडण्यात यश आले. त्यांच्याजवळ २ कुऱ्हाडी, २ लहान करवती, काळया रंगाची पिशवी त्यात स्वयंपाकाचे मसाले व इतर साहित्य तसेच ओल्या सालीसकट १३ किलो चंदनाचे लाकूड व तीन मोबाईल हँडसेट मिळून आले.
पिंटू वाल्मीक गिरे (वय ४४) व शिवराम आबा मेंगाळ (वय ३६, दोन्ही रा. गुजरदरी, ता. चाळीसगाव) अशी त्यांचे नावे आहेत. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी एम. के. रहाटकळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दरम्यान दोन्ही चंदन चोरांना येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची वन कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील फरार झालेल्यांचा शोध घेत असताना लोढरे (ठाकरवाडी, ता. नांदगाव, जि. नाशिक) येथे संशयित आरोपी मच्छिंद्र विठ्ठल पोकळे, भाऊराव लक्ष्मण मेंगाळ, सुखदेव गणपत आव्हाळे हे असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार, त्यांच्या घरी वन विभागाचे कर्मचारी गेले असता, ते तेथून फरार झाले होते. संशयित आरोपी सुखदेव आव्हाळे याच्या घराची तपासणी केली असता, घरात धारदार कुऱ्हाडी, सुरा, कोयता, पहार तसेच वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारे नॉयलॉनचे जाळे मिळून आले.
माहिती मिळाल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी गुजरदारी येथील संशयित धनराज आबा मेंगाळ, शिवराम पिंटू गिरे, भाऊराव मच्छिंद्र मेंगाळ, लखन कडूबा मेंगाळ हे फरार झाल्याचे दिसून आले. चंदन वृक्षतोडच्या या गुन्ह्यात ३ संशयित लोढरे (ठाकरवाडी) येथील असून ४ गुजरदरी येथील आहेत.
दरम्यान, दोघा संशयितांची वन कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी एम. के. रहाटकळ, वनपाल गादेचव्हाण, डी. के. जाधव, वनरक्षक आर. जी. तडवी, पी. सी. कुलकर्णी वनरक्षक, ए. बी. मोरे, उमेश सोनवणे, वनमजूर रमेश राठोड, राजाराम चव्हाण, गोरख राठोड, संदीप पवार, सचिन जाधव, बापू आगोणे यांच्या पथकाने केली. पुढील तपास विभागीय वन अधिकारी विशाल लोंढे व मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.