माध्यमिक शिक्षकांचा मुख्याध्यापक होण्याचा मार्ग मोकळा

२४ मार्चच्या अधिसूचनेतील संदिग्धता झाली दूर

0

 

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाने एक परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध केले असून या परिपत्रकामुळे शिक्षकांमधील संभ्रम दूर झाला असून माध्यमिक शिक्षकांचा मुख्याध्यापक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली,१९८१ नुसार माध्यमिक शाळेत नियुक्तीच्या वेळी पदवीधर व बी.एड. किंवा शासनाने मान्यता दिलेली तत्सम पदवी प्राप्त केलेल्या शिक्षकास मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्याची तरतूद आहे. परंतु दि.२४ मार्च २०२३ च्या एका अधिसूचनेनुसार पदवीधर व डी.एड. किंवा शासनाने मान्यता दिलेली तत्सम पदवी असलेल्या शिक्षकाला मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळते असे गृहीत धरून अनेक डी.एड. किंवा तत्सम पदवी धारकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन आपणास मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्याची मागणी केली. काही संस्था चालकांनी अशा शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नतीही देऊन टाकली. तर काही संस्थांमध्ये नियुक्तीच्या वेळी पदवीधर व बी.एड. किंवा तत्सम पदवी असलेल्या शिक्षकाला मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती दिली. या संस्थेच्या निर्णयाच्या विरोधात काही पदवीधर डी.एड. किंवा तत्सम पदवीधारक शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि औरंगाबाद व नागपूर खंडपीठात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. मात्र दि.२४ मार्च २०२३ च्या अधिसूचनेत नमुद केलेल्या बाबींबद्दल सर्वत्र शिक्षण विभागात संभ्रम निर्माण झाला होता. प्रत्येक जण आपापल्या परीने अर्थ लावत होता. शालेय शिक्षण विभाग हा संभ्रम दूर करु शकला नाही. त्यामुळे अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित राहिली.

अखेर अनेक शिक्षक संघटनांनी याबाबत शिक्षण मंत्रालयाला २४ मार्चच्या अधिसूचनेतील तरतुदींबाबत खुलासा करण्याची विनंती केली.त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाने नुकतेच दि.२८ जानेवारी रोजी एक परिपत्रक जारी करुन शिक्षकांमधील संभ्रम दूर केला आहे. त्यामुळे आता नियुक्तीच्या वेळी पदवीधर व बी.एड.किंवा शासनाने मान्यता दिलेली तत्सम पदवी प्राप्त केलेल्या शिक्षकाची सेवाज्येष्ठता प्रमाण मानली जाणार आहे. त्यामुळे अशा शिक्षकांचा मुख्याध्यापक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.