पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ दि. १६ रोजी पारोळा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. पारोळा शहरासह तालुक्यातील व्यापारी वर्गासह सर्वसामान्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
बांगलादेशात अल्पसंख्यांक समाजाच्या बांधवांवर अमानुषपणे अत्याचार, त्यांच्या निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा संपूर्ण हिंदू समाज बांधवांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला जात. बांगलादेशातील सकल हिंदू समाज व अल्पसंख्यांक बांधवांना भारत सरकारने सुरक्षा पुरवावी, अल्पसंख्यांक समाज बांधवांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संपूर्ण हिंदू समाजाच्या वतीने केली जात आहे.
पारोळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, गौरक्षक दल, भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने आज बांगलादेशातील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी संपूर्ण पारोळा तालुका बंद ठेवत मोर्च्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विविध घोषणा देत शहरातील बाजारपेठेतील मोठे हनुमान मंदीरात सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले. तसेच मोर्चा बालाजी मंदिरापासून बाजारपेठे मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विसर्जित करून पारोळा येथील तहसीलदार डॉ. उल्हासराव देवरे यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्ञानेश्वर पाटील, खासदार ए. टी. पाटील, नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे निवडणूक क्षेत्र प्रमुख महेश पवार, पारोळा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रिय, दुर्गा वाहिनीच्या सदस्या, ॲड. कृतीका आफ्रे, तसेच पत्रकार व हजारोंच्या संख्येने युवक युवती उपस्थित होते. याप्रसंगी शहरात ठिकठिकाणी पारोळा पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. संपूर्ण मोर्चा मार्गांवर पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरसिंह वसावे, राजेंद्र यादव, पोलीस कर्मचारी महेश पाटील, किशोर भोई इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.