धक्कादायक.. मेहुण्याने केला शालकाचा खून

विमा पॉलिसीच्या पैशांनी केला घात.. दोघांना अटक, पारोळा पोलिसांची कामगिरी

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

पारोळा तालुक्यात्तील शेवगे बुद्रुक येथील मेहुण्याने विम्याच्या पैशांसाठी शालकाचा खुन केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पारोळा पोलिसांना मोठे यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेवगे येथील कापसाचे  व्यापारी संदीप भालचंद्र पाटील (शेवगे ) याने त्याचा शालक समाधान शिवाजी पाटील (वय २६, रा.  फागणे जि. धुळे) हा काही काम धंदा करत नाही म्हणून त्याच्या नावावर विविध कंपन्यांचे करोडो रुपयांच्या विमा पॉलिसी काढून ठेवल्या होत्या व त्या पॉलिसींना मयत समाधानची आई व बहीण यांना वारस लावून ठेवले होते. म्हणजे समाधान मेल्यानंतर या वारसांच्या सह्या घेऊन पैसे काढता येतील तसेच त्याला त्याच्या नावावर नवी स्कुटी घेऊन देऊन तिच्या देखील फुल इन्शुरन्स काढून ठेवला होता.  दि. १७ एप्रिल रोजी शालक समाधान यास संदीप भालचंद्र पाटील शेवगे बुद्रुक व त्यांच्या साथीदार चंद्रदीप आधार पाटील रा. खवशी ता. अमळनेर यांनी समाधान यास अमळनेर येथुन पारोळा बोलाविले.

त्यास महामार्गावरील बायपास जवळील धरणगाव चौफुली जवळील  हॉटेलवर बोलवून  दारू पाजून त्यास त्याच्याचं स्कुटीवर महामार्गावरील पुनगाव रस्त्याजवळ अंधारात घेऊन जाऊन त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून जिवे मारून टाकले.  त्यानंतर त्याचा अपघात झाला आहे अशी खोटी परिस्थिती घटनास्थळावर निर्माण करून दोघेजण गावातील मित्रांना घेऊन पार्टीसाठी एका हॉटेलमध्ये घेऊन गेलेत. असे दर्शविले की मी गावातील मित्रांसोबत हॉटेलमध्ये पार्टीला होतो. त्यानंतर त्यांना असा फोन आला की तुमच्या शालकाचा अपघात झाला आहे असे दर्शविले व ते घटना स्थळी गेले व समाधान यास रुग्णवाहिका मागवून धुळे येथे पाठविण्यात आले.

धुळे येथील डॉक्टरांनी तपासणी करून समाधान मयत झाल्याचे सांगण्यात आले, त्यानुसार धुळे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आरोपी संदीपने समाधान शालकाचे शव आणून लगेच अंत्यविधी उरकून टाकला. त्यानंतर तपासी अधिकारी सुनील हाटकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचे निदर्शनास आल्यावरून त्यांनी पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे यांना सदर प्रकार लक्षात आणून दिला.  त्यावरून मयत व इतरांचे सर्व कंपनीचे मोबाईल नंबर प्राप्त करून त्यांच्या सीडीआर काढून त्यांचे अवलोकन केले.

अपघाताची खबर देणारा संदीप पाटील याने दिलेली खबर व प्रत्यक्षदर्शी पुरावे यात तफावत आढळून आली.  त्यानंतर पोलिसांनी घटना घडल्यापासून पारोळा शहरातील एका हॉटेलवर  तपास पथक रवाना करून सीसीटीव्ही फुटेज पाहून व गोपनीय बातमीदार यांना सदर घटनेची सविस्तर माहिती देऊन त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून असे निष्पन्न झाले की, यातील आरोपी संदीप पाटील याने त्याच्या शालक समाधान (मयत) यांच्या नावावर विविध कंपन्यांचे पॉलिसी काढून ठेवल्या होत्या.  शालक वारल्यानंतर करोडो रुपये मिळतील या हव्यासापोटी चंद्रदीप व संदीप यांनी कटकारस्थान रचून अपघाताचा बनाव करून खून केल्याचे पारोळा पोलिसांनी अवघ्या दहाच दिवसात खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.  यामुळे पारोळा पोलीसांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

याप्रकरणी आरोपींना पारोळा पोलिसांनी अमळनेर येथून अटक करून त्यांना पारोळा न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास अमळनेर विभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलीस  करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.