युती विरूद्ध जनाधार विकास आघाडीत सामना
पारोळ्याकडे लागले जिल्ह्याचे लक्ष : आजी-माजी आमदारांमध्ये लढत
पारोळा / अशोककुमार लालवाणी
संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून पारोळ्यातही नगराध्यक्षपदासह 12 प्रभागात 24 नगरसेवकासाठी निवडणुकीच्या रणधुमाळीचा धुराळा उडत आहे.
येथे नेहमी प्रमाणेच पारंपारीक लढाई पाहायला मिळत आहे. यात विद्यमान आमदार अमोल पाटील यांच्या युती विरूद्ध माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील व माजी नगराध्यक्ष करण पवार यांची जनाधार शहर विकास आघाडी असे चित्र दिसत आहे. येथे नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवार असून यात युतीकडून माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, जनाधार विकास आघाडीच्या वतीने माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या पत्नी अंजली पवार तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सुवर्णा पाटील रिंगणात आहेत.
निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तसे तसे प्रचारालाही वेग येताना दिसत आहे. प्रचारात मात्र युतीने आघाडी घेतली असून युतीच्या वतीने बड्या नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची सभा पार पडली. प्रचारात पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे, भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी या सभेला संबोधित केले. दुसरीकडे जनाधार विकास आघाडीच्या वतीने हिंदुस्थानी भाऊ यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील अनेक प्रभागात अटीतटीच्या लढती रंगणार आहे तर काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तीरंगी लढती होणार असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी एकतर्फी निकाल देखील अपेक्षित असल्याचे सर्वेक्षणातून समोर येत आहे. यावेळी रिक्षा भोंग्यापेक्षा कार्नर सभा व
प्रत्यक्ष भेटीवर भर दिला जात असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्याचे लागले लक्ष
पारोळ्यात आमदार अमोल पाटील, माजी पालकमंत्री डॉ. सतिष पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून येथील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. येथे शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशी महायुती असून युतीने आघाडीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. एकंदरीत येथील लढतीने राजकीय वातावरण तप्त झाले आहे.

