पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा शहरातील महापुरुषांच्या सर्व पुतळ्याची युवक सप्ताह निमित्त युवकांच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. युवक सप्ताहानिमित्त शहरातील सर्व पुतळ्यांचे स्वच्छता अभियान अभाविपच्या वतीने यशस्वीरित्या राबविण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व पारोळा नगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाचा उद्देश स्वच्छतेचा संदेश दिला.
शहरातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पुतळ्यांची देखभाल आणि स्वच्छता ही स्थानिक प्रशासन व सामाजिक संघटनांसाठी नेहमीच महत्त्वाची बाब राहिली आहे. पुतळ्यांवर साचलेली धूळ व घाणीचे थर काढून त्यांना नवे रूप देण्यात आले. या वेळी अभाविपचे पारोळा शहर मंत्र्यांनी सांगितले की, युवक सप्ताहानिमित्त हा उपक्रम केवळ स्वच्छतेसाठी नाही तर तरुणांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे हा आहे.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, शहर स्वच्छ ठेवणे हे केवळ प्रशासनाचेच काम नाही, तर प्रत्येक नागरिकाने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल शहरातील नागरिकांनी अभाविप आणि पालिकेचे कौतुक केले. यावेळी शहर मंत्री अंकित पवार, सहशहर मंत्री चेतन वैष्णव, श्याम खाडे यांच्यासह नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.