पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील पुरातन ‘भुईकोट किल्ल्या’वर राजा शिवछत्रपती परिवार जळगांव, या संस्थेच्या ९ व्या वर्धापन दीनानिमित्त स्वच्छ्ता मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत पाच जिल्ह्यातून मावळे सहभागी होऊन सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत किल्ल्याच्या तटबंदी, प्रवेश द्वार व आतील भागातुन जवळपास ४० ते ४५ टन कचरा जमा केल्याने, किल्ल्याचे रुप बदलल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
याबाबत अधिक असे की, जळगाव विभागाची हि सुवर्ण महोत्सवी मोहीम होती. या मोहिमेसाठी जळगाव, मुंबई, धुळे, नाशिक, अकोला, बुलढाणा या जिल्यातील युवक-युवती, तसेच पारोळा शहरातील किसान महाविद्यालय व राणी लक्ष्मीबाई कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक असे जवळपास २४o मावळे व स्वंयसेवी या स्वच्छ्ता मोहिमेसाठी सहभागी झाले होते. किल्ल्यातील गणेश मंदिर व महादेव मंदिराच्या परिसरात स्वछता करून वृक्षारोपण करण्यात आले. किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूने तटबंदीवर अनेक लहान मोठ्या वृक्षांची वाढ झाल्यामुळे तटबंदीला धोका निर्माण झाला होता. अशा वृक्षांना काढल्याने तटबंदी व बालेकिल्ला परिसराने मोकळा श्वास घेतला. दरम्यान, पुरातन विहरीचा शोध देखील मावळ्यांना लागला.
मोहिमेसाठी मराठा प्रीमियर लीग जळगाव, स्थानिक आमदार चिमणराव पाटील, माजी नगराध्यक्ष गोविद शिरोळे, श्री साई हॉस्पिटलचे संचालक डॉ संभाजीराजे पाटील, देवगाव चे सरपंच समीर पाटील तसेच शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी भेट देऊन मावळ्यांच्या कामाचं कौतुक केले. स्थानिक मावळे म्हणुन डॉ गोपाल पाटील, दिपक पाटील, डॉ मनीष पाटील, दिगंबर कुंभार, सागर पाटील, अनिल भोई यांनी परिश्रम घेतले.