“मुंडे साहेबांनी मला जो वसा आणि वारसा दिला त्यात कधीही तडजोड होऊ देणार नाही !
सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचे दसरा मेळाव्यात प्रतिपादन

सावरगाव घाट (प्रतिनिधी) – विजयादशमीच्या पवित्र पर्वानिमित्त सावरगाव घाट येथील भगवान गडावर भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या वार्षिक दसरा मेळाव्याचे आयोजन गुरुवारी करण्यात आले. हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाने मोठ्या उत्साहात या मेळाव्यात सहभाग घेतला आणि पंकजा मुंडे यांच्या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आपल्या ओजस्वी भाषणातून पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या वारशाला उजाळा देत त्यांची भूमिका पुढे नेण्याची ग्वाही दिली. “मुंडे साहेबांनी मला जो वसा आणि वारसा दिला आहे, त्याला कधीही तडजोड होऊ देणार नाही. मी सत्तेत असो वा विरोधात, सामान्य माणसाचे हित नेहमीच माझ्या कार्याच्या केंद्रस्थानी राहील,” असे त्या म्हणाल्या.
मेळाव्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ठळकपणे अधोरेखित झाला. पंकजा मुंडे म्हणाल्या, “गोपीनाथ मुंडे यांनी मराठा आरक्षणाला नेहमीच पाठिंबा दिला होता. त्यांच्या विचारांशी मी शंभर टक्के सहमत आहे. मात्र आमच्या लेकरांच्या ताटातलं हिसकावून घेऊ नका, एवढीच आमची विनंती आहे.” यासोबतच त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबतही बांधिलकी व्यक्त केली. “काल बोऱ्हाडे धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसला होता, तेव्हा मी दोन दिवस त्याच्यासोबत बसले. जाती-पातीच्या प्रत्येक समाजासाठी मी लढत राहणार आहे,” असे त्या म्हणाल्या.
सामाजिक समरसतेवर विशेष भर देताना पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना जातीभेदाच्या पलीकडे जाऊन माणुसकीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. “मी कधीच कोणाची जात पाहिली नाही, फक्त माणसाची जात पाहिली. मला भगवान बाबांनी आणि माझ्या वडिलांनी भेदभाव शिकवला नाही,” असे सांगत त्यांनी एकतेचा संदेश दिला. स्वाभिमानाचे महत्त्व अधोरेखित करत त्या म्हणाल्या, “दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने जगा. कोणाचे तुकडे उचलू नका, खोटी कामं करू नका. चांगल्या माणसाचं चांगलं होतंच, आणि भगवान बाबांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतात.”
भगवान गडाच्या पवित्र भूमीवरून दिलेला हा संदेश केवळ समर्थकांना प्रेरित करणारा ठरला नाही, तर पंकजा मुंडे यांच्या राजकीय प्रभावाबरोबरच त्यांच्या सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडवणारा ठरला. मराठा आरक्षण, सामाजिक न्याय आणि स्वाभिमान या त्रिसूत्रीवर उभारलेला हा दसरा मेळावा आगामी राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाचा ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


