श्रद्धा अंधश्रद्धेच्या फेऱ्यात रुद्राक्ष महोत्सव

0

लोकशाही संपादकीय लेख

मध्य प्रदेशातील सिहोर या जिल्ह्याच्या ठिकाणी कुबेरेश्वर धाम येथे पंडित प्रदीप मिश्रा यांचे अधिपत्याखाली १६ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी रुद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत प्रदीप मिश्रा यांचे कथा प्रवचन होणार असे जाहीर करण्यात आले. सिहोरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या रुद्राक्ष महोत्सव व पंडितांच्या प्रवचनाला हरिश्चंद्र परवानगी दिली होती. त्यामुळे ५ ते ६ लाख भाविक पूर्ण भारतभरातून येथील कुबेरेश्वर धाम समितीने जाहीर केले. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला राहण्याची, जेवणाची मोफत व्यवस्था करण्याचे तसेच मोफत रुद्राक्ष वाटपाचे आयोजन करण्यात आल्याचे जाहीर केले होते. सिहोर येथील यंदाचे हे दुसरे रुद्राक्ष महोत्सव होते. गेल्या वेळेचा अनुभव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने १० लाख भाविक येतील असे गृहीत धरून नियोजन केले होते. तथापि दहा लाखापेक्षा जास्त म्हणजे तब्बल २० लाखापर्यंत भाविकांचा लोंढा सिहोर येथे आल्याने सर्वच प्रकारची व्यवस्था कोलमडली. जेवायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, प्रातःविधीसाठी जागा नाही, झोपण्यासाठी जागा नाही. जिकडे तिकडे सैरावैरा फिरणारी माणसेच माणसे.

महाराष्ट्रातील एका महिलेचा या ठिकाणी हार्ट अटॅकने मृत्यू झाला. एक आजारी लहान मूल मृत्युमुखी पडले. जळगाव जिल्ह्यातील महिलांचा अपघाती मृत्यू झाला. तसेच अनेक परिवारांचे सदस्य गायब झाले आहेत. चेंगराचेंगरीत सात हजार नागरिक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. भोपाळ ते इंदूर महामार्गावर पंधरा ते वीस किलोमीटर पर्यंतची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या लग्नाचा मुहूर्त देखील टळला. लग्न उशिराने लागले. सिहोरच्या रेल्वे स्टेशन वर माणसांना पाय ठेवायला जागा नव्हती, इतकी प्रचंड गर्दी होती. गर्दीमुळे मोबाईल सेवा कोलमडली. संपर्काचे साधन उरले नाही. प्रचंड गर्दी लक्षात घेऊन कुबेरेश्वर धाम समिती तसेच जिल्हा प्रशासनाने रुद्राक्ष महोत्सव रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी, असाध्य रोग दूर करण्यासाठी, मोफत रुद्राक्ष घेण्यासाठी सिहोर येथे देशभरातून गर्दी केलेल्या भाविकांची पूर्ण निराशा झाली. आणि कमालीच्या यातना सहन करून त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. या रुद्राक्ष महोत्सवातील गर्दीने किती जणांचा मृत्यू झाला, याची अधिकृत आकडेवारी अद्याप आलेली नाही. परंतु एकविसाव्या विज्ञान युगातही आपली जनता चमत्कारीक रुद्राक्ष आदींवर विश्वास व्यक्त करते, म्हणजे विज्ञानाला मोठे आव्हानच म्हणावे लागेल…!

सिहोरला रुद्राक्ष महोत्सवात जे विपरीत घडले, ज्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला, लहान आजारी मुलगा मृत्युमुखी पडणे, यांना रुद्राक्षाचे तीर्थ देऊन त्यांचे प्राण का वाचवू शकले नाही? या प्रश्नाचे उत्तर मिळू शकत नाही. चेंगराचेंगरीत आजारी पडलेल्या सात हजार जणांना उपचारार्थ दवाखान्यात दाखल का करावे लागले? त्यांचे उत्तर कोण देणार? रुद्राक्ष मोफत वाटायचे होते तर तेवढी मोठी गर्दी बोलवायचे कारण काय? पंडित प्रदीप मिश्रा यांचे प्रवचन दूरदर्शनवर घरबसल्याही ऐकता येते. तेव्हा एवढी मोठी गर्दी करण्याचा घाट कशासाठी? गर्दी वाढली की आपली लोकप्रियता सिद्ध होते आणि स्वतःचे महत्त्व वाढवून घेतले जाते काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. श्रद्धेच्या नावाने अशी दुर्घटना होते त्याला जबाबदार कोण?

श्रद्धा ही मोठी चमत्कारिक बाब आहे. सध्या जेलमध्ये असलेल्या आसाराम बापूंच्या अनेक बाबी उघडकीस येऊन त्यांच्यावर उलट सुलट चर्चा होत आहे. आसाराम बापूंचे लाखो कोट्यावधी भाविक त्यांचा फोटो घराच्या मंदिरात लावून त्यांची पूजा करत होते. आजही काही कट्टर भाविकांचा आसाराम बापूंवर विश्वास आहे. त्यामुळे पंडित प्रदीप मिश्रा यांनी ‘कंकर मे शंकर’ म्हणत अभिमंत्रित रुद्राक्षमुळे अनेक आजार बरे होतात, आपल्या मनोकामना पूर्ण होतात, असे सांगून लकवा आणि कॅन्सर सारखे असाध्य रोग सुद्धा बरे होऊ शकतात, असा दावा करतात. एवढेच पावन अभिमंत्रित रुद्राक्ष असताना कोट्यावधी रुपये खर्चून हॉस्पिटल बांधण्याची आवश्यकता का होती? या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरीत आहे. २१ व्या शतकातील विज्ञान युगात मनोकामना पूर्ण करणाऱ्या रुद्राक्षासाठी भारतभरातून लाखो भाविकांची गर्दी उडते, याचा अन्वयार्थ काय आहे? त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या फेऱ्यात लोक अधिकाधिक गुंतत चालले आहेत हे मात्र सत्य आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.