लोकशाही खाद्य विशेष
पंचामृत म्हटलं की दूध, दही, तूप, मध आणि साखरेची गोड, सात्त्विक चव आठवते. याच पारंपरिक पंचामृताचा स्वाद मऊ, सुगंधी केकमध्ये आणला तर तयार होतो एक वेगळाच आणि घरच्या घरी सहज बनवता येणारा पंचामृत फ्लेवर केक. वेलची-जायफळाचा मंद सुगंध आणि पंचामृताची हलकी गोडसर चव या केकला खास बनवते.
साहित्य :
दीड कप मैदा, पाऊण कप पिठीसाखर, अर्धा कप दही, अर्धा कप दूध, पाव कप तूप, दोन टेबलस्पून मध, एक टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, एक टीस्पून व्हॅनिला इसेन्स, अर्धा टीस्पून वेलची पूड, एक चिमूट जायफळ पूड आणि एक चिमूट मीठ.
पंचामृतासाठी :
तीन टेबलस्पून दूध, दोन टेबलस्पून दही, एक टेबलस्पून तूप, एक टेबलस्पून मध आणि एक टेबलस्पून बारीक साखर.
कृती :
- १) प्रथम ओव्हन १७०° सेल्सिअस वर गरम करून घ्यावा. केकच्या साच्याला तूप लावून त्यात बटर पेपर ठेवावा.
- २) एका भांड्यात दही, पिठीसाखर, वितळलेले तूप आणि मध घेऊन चांगले फेटून घ्यावे. त्यात दूध आणि व्हॅनिला इसेन्स घालावा.
- ३) दुसऱ्या भांड्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, वेलची पूड आणि जायफळ पूड चाळून घ्यावी.
- ४) हे कोरडे मिश्रण थोडेथोडे करून दहीच्या मिश्रणात घालावे आणि हलक्या हाताने एकजीव करावे. मिश्रण जास्त फेटू नये.
- ५) तयार मिश्रण केकच्या साच्यात ओतून साधारण तीस ते पस्तीस मिनिटे बेक करावे. टूथपिक स्वच्छ बाहेर आली की केक तयार झाला असे समजावे.
- ६) दरम्यान पंचामृतासाठी दिलेले दूध, दही, तूप, मध आणि साखर एकत्र करून मंद आचेवर किंचित गरम करावे. मिश्रणाला उकळी आणू नये.
- ७) केक पूर्ण थंड झाल्यावर त्याच्या वर हलकी छिद्रे करून तयार पंचामृत हळूहळू सर्वत्र पसरवावे.
- ८) वरून काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालून सजवावे.
- ९) केक दोन ते तीन तास फ्रिजमध्ये ठेवल्यास पंचामृताचा स्वाद केकमध्ये छान मुरतो आणि केक अधिक मऊ व रसाळ लागतो.

पत्रकार/फुड ब्लॉगर, मुंबई
मो. ९८९२१३८१३२

