भुसावळ बोईसर ST खोल दरीत कोसळली; 20 प्रवासी गंभीर जखमी

0

पालघर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पालघर येथील वाघोबा खिंडीत भुसावळ ते बोईसर या महामंडळाच्या रातराणी बसचा भीषण अपघात होऊन ही एसटी बस थेट दरीत कोसळली. बस चालकचे नियंत्रण सुटल्याने बस 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात बसमधील 15 ते 20 जण गंभीर जखमी झालेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय.

दरम्यान बस चालक दारु पिऊन बस चालवत असल्याचा आरोप काही प्रवाशांनी केलाय. सध्या अपघातातील जखमींना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

रातराणी बस सेवेअंतर्गत एसटी महामंडळाकडून विशेष बस सेवा चालवली जाते. दरम्यान, भुसावळ-बोईसर या मार्गावरील एसटी बसचा सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातानंतर एसटी बसमधील प्रवाशांना चालकावर गंभीर आरोप केले आहेत.

भुसावळ-बोईसर मार्गावर वाघोबा खिंडीत एसटी बस आली असता चालकाचं नियंत्रण सुटलं आणि एसटी थेट 20 ते 25 फूट खोल दरीमध्ये कोसळली. दरम्यान, त्याआधी नाशकात या बसचा चालक बदलण्यात आला होता. बदलण्यात आलेल्या चालकानं दारुचं सेवन केलं असल्याचा आरोप प्रवाशांनी केला होता. याबाबत कंडक्टरकडे तक्रारही करण्यात आली होती. मात्र मद्यधुंद चालकाबाबतच्या तक्रारींकडे कंडक्टरने दुर्लक्ष केलं असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे.

नशेत असलेल्या बस ड्रायव्हरने वेगाने गाडी चालवली होती. भयंकर पद्धतीनं बस चालवत असलेल्या या चालकाचं अखेर वाघोबा खिंडीत नियंत्रण सुटलं आणि त्यामुळेच हा अपघात घडला, असा आरोप जखमी प्रवाशांनी केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.