पाल येथे ३३ म्हशींची अवैध वाहतूक

तीन वाहनांसह ६४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

0

रावेर, लोकशाही न्यूज  नेटवर्क 

अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या चार वाहनांसह ३३ म्हशी जप्त करून ६४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल पाल (ता. रावेर) येथील शेरी नाक्यावर ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी वाहनचालकांना अटक करण्यात आली असून रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर पाेलिस ठाण्यांतर्गत मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या शेरीनाका येथे नाकाबंदी करण्यात आली आहे. बुधवारी (ता. १६) रात्री दोनच्या सुमारास चार वाहनांतून म्हशींची निर्दयीपणे वाहतूक करताना संशयित मिळून आले. पाल दूरक्षेत्रात आयशर (एमएच १८, बीझेड ७४५५), (एमएच १८, बीजी ८९३६), (एमएच १८, बीजी ३८२३) व (एमपी ०९, डीजी ६६४४) ही चारही वाहनांना थांबवून तपासणी केली असता, वाहनांमध्ये निर्दयीपणे म्हशींना काेंबून नेण्यात येत हाेेते. या गुरांसाठी चाराही नसल्याचे आढळून आले.

पोलिस निरीक्षक तुषार पाटील, हवालदार जगदीश पाटील, पोलिस कर्मचारी ईश्वर चव्हाण, हमिद तडवी यांनी इरफान खान हिरूखान मेवाती (रा. सारबेटा ता.  अमळनेर), इनायत खान काल्या खान (रा. बनखड, ता. कसरावद, जि. खरगाेन, मध्य प्रदेश), राजूखॉं सलीमखॉं (रा. ताजपूर, ता.जि. उज्जैन, मध्य प्रदेश), अलीखान शरीपखान (रा. पालसमद, ता. कसरावद, जि. खरगाेन, मध्य प्रदेश) या चारही वाहनावरील चालकांना ताब्यात घेतले.

म्हशी खरेदी केल्याचे कागदपत्र,  डाॅक्टरांचे प्रमाणपत्र, वाहतूक परवानाबाबत विचारपूस केली असता, त्यांच्याकडे काेणतेही कागदपत्र नसल्याचे संशयितांनी सांगितले. याबाबत पाेलिस कर्मचारी हमीद तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.