जिल्हा दूध संघ निवडणुकीत मतदारांना पाकिटे मिळाली?

0

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक गाजली. शिंदे भाजप गटाचे शेतकरी विकास पॅनल आणि महाविकास आघाडी सहकार पॅनल आमने-सामने लढले. पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व केले, तर सहकार पॅनलचे नेतृत्व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले. जिल्हाभरात एकूण ४४७ मतदार असलेली ही निवडणूक चुरशीची होणार, तशी ती झाली सुद्धा. खडसे गटाची सात वर्षे दूध संघावर सत्ता होती. खडसेंच्या सत्तेला सुरुंग लावून गुलाबराव पाटील, गिरीश महाजनांसह २० पैकी १५ जण विजयी झाले. आरोप प्रत्यारोपाने निवडणूक गाजली. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दोन्ही पॅनलकडून पैशाचा वापर होणार, अशा चर्चेला ऊत आला होता.

आता दूध संघाची निवडणूक होऊन पुरते पंधरा दिवस झाले नाहीत तोच सोसायट्यांतर्फे ज्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आणि ज्यांनी सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून मतदान केले त्यांच्यावर आणि दूध उत्पादक सोसायटीचे संचालक यांच्यात मतदानासाठी मिळालेल्या पैशावरून वाद निर्माण होऊन तो वात चव्हाट्यावर आल्याची घटना भालोद गावात घडली. भालोदचे दूध उत्पादक सोसायटीचे चेअरमन संजय ढाके हे जरी असले तरी सोसायटी संचालकांनी ठराव करून सोसायटीचे संचालक दिलीप चौधरी यांना मतदानाचा अधिकार दिला होता. त्यानुसार दिलीप चौधरी यांनी जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावला. दूध संघाच्या निवडणुकीत फुलीसाठी पैसे मिळाले अशी कुजबुज जिल्हाभरात सुरू असली तरी भालोद येथील घटनेने त्यावर शिक्का मोर्तब झाला असल्याचे म्हणता येईल.

काल भालोद दूध उत्पादक सहकारी सोसायटीच्या कार्यालयासमोर मतदानासाठी मिळालेला पैसा मतदान करणारे दिलीप चौधरी यांनी दूध उत्पादकांना दिला पाहिजे म्हणून भालोद  दूध उत्पादक सोसायटीचे संचालक लीलाधर नारायण चौधरी उर्फ आप्पा चौधरी आणि सोसायटीचे ज्यांना दूध संघ निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार दिला होता ते दिलीप चौधरी यांच्यात सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची होऊन नंतर एकमेकांच्या अंगावर धावून गुदागुद्दी करण्यापर्यंत मजल गेली.

सोसायटीच्या समोरच हा प्रकार झाल्याने क्षणात भालोद गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात जमले. भालोद गावच्या ग्रामपंचायतीसमोरच मतदानासाठी मिळालेल्या पैशाचा हिस्सा मिळावा म्हणून आप्पा चौधरी जोरात ओरडत होते. त्यावेळी “मला मतदानासाठी पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे मी पैसे कुठून देऊ..!” असे म्हणून “मी भाजपला मतदान केले आहे. मला पैसे मिळाल्याचे सिद्ध करून दाखव.. तेव्हा मी पैसे देईल..!” असा हमरी-तुमरीचा वाद झाला. दोघे संचालक सोसायटीच्या सभांना एकत्र येत असल्याने त्यांचे ‘अरे तुरेचे’ संबंध असल्याचे भांडणात दिसून आले. हे भांडण भालोद दूध सोसायटी कार्यालयासमोर चालू होते. त्यावेळी सोसायटीचे एक संचालक भारत भालेराव हेही या गर्दीत दिसत आहेत.

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत दोन्ही पॅनलकडून पैशाचे वाटप झाले असले तरी ते सिद्ध करणे शक्य नाही. तथापि पैशाचे वाटप झाले हे अधिकृतपणे सिद्ध होणार नसले, तरी भालोद दूध विकास सोसायटी संचालकांचे ‘मतदानासाठी मिळालेल्या पैशासाठी भांडण होते’ याचा अर्थ सोसायटी संचालकांना याची माहिती होती, हेच यावरून सिद्ध होते. या संदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ‘आम्ही पैसे दिले नाही’ असा खुलासा केला. तथापि या संदर्भात सहकार पॅनलचे प्रमुख एकनाथ खडसे यांनी ‘दूध संघाच्या निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. तीन लाख, दोन लाख ते दीड लाखापर्यंत पैशाचे वाटप झाले आहे’, असा आरोप केला. दूध संघाच्या निवडणुकीत खोके रिकामी करण्यात आले, असा खोचक टोलासुद्धा मारला.

एकंदरीत भालोद दूध उत्पादक सहकारी सोसायटीच्या मतदार प्रतिनिधीला पैसे मिळाले अथवा मिळाले नाहीत, हा वादाचा प्रश्न असला तरी मतदानासाठी मिळालेल्या पैशाचा हिश्यासाठी भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संबंधितांचे धाबे दणाणले, या शंका नाही. एक तर मतदानाची जी गुप्तता पाळली जायला हवी ती येथे पाळली गेली नाही. मतदान करणारे दिलीप चौधरी म्हणतात “होय.. मी भाजपला मतदान केले..” गुप्त मतदानाची वाचता करण्यामागचा उद्देश मात्र कळू शकला नाही.

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे नवनियुक्त चेअरमन चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना चेअरमन पदाची सूत्रे हाती देऊन अवघे आठ दिवस झाले नाहीत, तोच भालोदचे हे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे दिवसभर त्याच वृत्ताची जिल्हाभरात चर्चा सुरू होती. आता यापुढे काही दिवस याचे कवित्व सुरू राहील. परिणामी नवनियुक्त चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांना मूळ संघाच्या विकासाबरोबर आता अशा बाबींनाही तोंड द्यावे लागणार आहे..!

Leave A Reply

Your email address will not be published.