घरफोडी प्रकरणातील संशयिताला अटक ; ४ लाख ८२ हजारांचा ऐवज जप्त
पाचोरा (प्रतिनिधी) – पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्री सार्वे (ता. पाचोरा) येथे ७ एप्रिल २०२५ रोजी घडलेल्या घरफोडीच्या घटनेचा तपास करताना पोलिसांनी या प्रकरणात सुमारे ४ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
पिंप्री सार्वे येथील रहिवासी आनंदराव विठ्ठल पाटील यांच्या घरातील पत्र्याच्या खोलीत घुसून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६ तोळे सोने लंपास केले होते. या घटनेनंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ८३/२०२५ भा.दं.वि. कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पोहेकॉ नरेंद्र नरवाडे, पो.कॉ. अमोल पाटील, नामदेव इंगळे आणि इमरान पठाण यांच्या विशेष पथकाने राजेंद्र किसन पाटील (वय ४२, रा. पिंप्री सार्वे) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
तपासादरम्यान आरोपीकडून ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे , १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस , २ चांदीचे पैंजण एकूण किंमत ४ लाख ८२,हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ नरेंद्र नरवाडे करत आहेत.