‘ती’ सामूहिक आत्महत्या प्रेमप्रकरणातून..

सोशल मीडियातून झाले प्रेम, सोबत राहण्याचा निर्णय अन्, चिमुकल्यासह दोघांची रेल्वेखाली उडी

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानकदरम्यान काल रेल्वे रुळावर चिमुकल्यासह एक महिला आणि पुरुषाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेबाबत मोठा खुलासा झाला आहे. सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचे रूपांतर थेट प्रेमात झाले.  दोन्ही विवाहित असताना देखील त्यांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. याकरिता ती घर सोडून आली. मात्र त्यांच्या प्रेमाचा करुण अंत झाला. आठ दिवस सोबत राहिल्यानंतर एका चार वर्षाच्या चिमुकल्यासह दोघांनीही रेल्वेखाली उडी मारत जीवनयात्रा संपविल्याची घटना पाचोरा तालुक्यात घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील भातखंडे येथील राजेंद्र मोरे व राधिका ठाकरे असे या दोघांची नावे आहेत. या दोघांनी परधाडे (ता. पाचोरा) रेल्वे स्थानकाजवळ चार वर्षीय सारंगसह रेल्वेखाली आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. दोघेही विवाहित असून त्यांना अपत्य आहेत. दरम्यान राजेंद्र निंबा मोरे भातखंडे येथे मोलमजुरी करून परिवाराचा उदर्निवाह करत होता. सोशल मीडियावरून त्याची ओळख बारामती येथील राधिका लहू ठाकरे हिच्याशी झाली. त्यांनी प्रेमात वचने दिली.

दोघांमधील प्रेम वाढत गेल्याने अखेर राधिकाने राजेंद्रसोबत राहण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान राजेंद्रची पत्नी माहेरी गेल्यानंतर राजेंद्रने राधिकाला भातखंडे येथे घरी आणले. आठ ते दहा दिवसांनंतर राजेंद्रच्या घरी कौटुंबिक वाद झाल्याने तेव्हा ते घर सोडून निघून गेले. मात्र ५ मे रोजी गावी परतण्याचा निर्णय घेतला असता पाचोरा येथे आले. मात्र, परधाडे शिवारातील रेल्वेमार्गावरून जात असताना दोघांनी धावत्या रेल्वेखाली चार वर्षीय मुलासह उडी घेतली.

तिघांचे मृतदेह रेल्वे रूळावर छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेले आढळून आले. याबाबत माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर तिघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणले. पोलिसांनी तिघांचा तपास सुरू केला असता, अवघ्या काही तासांत आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण काय? याचा उलगडा झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.