पाचोरा-जामनेर ब्रॉडगेज प्रकल्पाला गती

अशोका बिल्डकॉनच्या ५६८ कोटींच्या कामाला मान्यता

0

पाचोरा-जामनेर ब्रॉडगेज प्रकल्पाला गती

अशोका बिल्डकॉनच्या ५६८ कोटींच्या कामाला मान्यता

पाचोरा प्रतिनिधी पाचोरा ते जामनेर दरम्यान प्रस्तावित ब्रॉड गेज रेल्वे मार्गाच्या प्रतिक्षेत असलेल्या हजारो नागरिकांसाठी दिवस उत्साहवर्धक ठरला आहे. १२ एप्रील रोजी केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाने या बहुप्रतिक्षित प्रकल्पासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून अशोका बिल्डकॉन लिमिटेड या नामांकित कंपनीला तब्बल ५६८ . ८६ कोटी रुपयांची निविदा मंजूर केली आहे. या निविदेमार्फत पाचोरा-जामनेर दरम्यान ५३ किमीच्या अंतरातील संपूर्ण सिव्हिल वर्क – अंडरब्रिज, ओव्हरब्रिज, लहान मोठे पूल, रस्ते, पथवे, तसेच पाचोरा यार्ड व यार्डमधील रस्त्यांचे काम अशोका बिल्डकॉन कंपनीला सुपूर्द करण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकल्पासाठी ३० महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली असून, या कालावधीत हे सर्व सिव्हिल काम पूर्ण करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे सर्व सिव्हिल काम पूर्ण झाल्यानंतरच या मार्गावर प्रत्यक्ष रेल्वे ट्रॅक पूर्ण करून रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. अशोका बिल्डकॉन लिमिटेड ही देशातील अव्वल दर्जाची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी असून, रोड व हायवे प्रकल्पांपासून रेल्वे, ऊर्जा व शहरी विकास क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे. या प्रकल्पातही अशोका बिल्डकॉनने सर्वात कमी किंमत (लोवेस्ट बीडर) सादर केली होती. परिणामी त्यांच्याकडे हा प्रकल्प सोपविण्यात आला असून त्यांनी गुणवत्तापूर्ण व वेळेत काम पूर्ण करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाला दिले आहे.

या निविदेतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे केवळ मार्गाची रुंदीकरणाची कामेच नव्हे तर संपूर्ण सिव्हिल स्ट्रक्चर – म्हणजेच अंडरपास, ब्रिजेस, ड्रेनेज सिस्टिम, सिग्नलिंगच्या दृष्टीने आवश्यक असलेले स्ट्रक्चरल फाउंडेशन्स आणि यार्ड डेव्हलपमेंट – हे सर्व या टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ट्रॅक टाकण्याचे, विद्युतिकरणाचे व सिग्नलिंगचे काम सुरू होईल. या प्रकल्पासाठी गेली अनेक वर्षे पाचोरा-जामनेर ब्रॉड गेज रेल्वे कृती समितीने विविध माध्यमांतून, राजकीय पातळीवर व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत सतत प्रयत्नशील होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण संघर्षाचेच हे फलित मानले जात आहे. या कृती समितीचे अनेक पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, वंचित भागातील ग्रामस्थ, उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी यांच्या सह वेळोवेळी आंदोलन, निवेदनं, पत्रकार परिषदांद्वारे हा प्रश्न केंद्रस्थानी ठेवला होता. कृती समितीच्या प्रतिनिधींनी जळगाव जिल्ह्याचे खासदार, रेल्वे मंत्री, राज्यातील पालकमंत्री वेळेप्रसंगी थेट दिल्ली गाठून संबंधितांशी वेळोवेळी संवाद साधत या मार्गाच्या गरजेबाबत ठोस मुद्दे मांडले. अनेक वेळा तांत्रिक बैठकांमध्ये, दिल्ली व मुंबई येथे जाऊन या प्रकल्पाचे फायदे मांडण्यात आले. परिणामी आता या महत्त्वाच्या टप्प्याला या मार्गाने गाठले आहे.

या प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व जामनेर या दोन्ही तालुक्यांसह परिसरातील अनेक सलग्न गावांना मोठा फायदा होणार आहे. या मार्गावरून सुरू होणाऱ्या प्रवासी व मालवाहतूक सेवेचा उपयोग स्थानिक उद्योगांना, शेतीमाल वाहतुकीला आणि पर्यटनवाढीसाठी होणार आहे. पाचोरा हे मध्य रेल्वेच्या मुंबई-भुसावळ मार्गावरील महत्त्वाचे स्टेशन असल्यामुळे जामनेरकडे ब्रॉड गेज जोडणी झाल्यास हा संपूर्ण परिसर विकासाच्या नव्या दिशेने वाटचाल करेल.
शेती उत्पादन, कापूस, सोयाबीन, डाळी, कांदा, मका, केळी यासारख्या शेतमालाचे थेट ट्रान्सपोर्टेशन यामुळे शक्य होईल. शिवाय व्यापारी ,विद्यार्थ्यांना व कामगारांना प्रवासाचे जलद, सुरक्षित व स्वस्त साधन उपलब्ध होईल. पर्यटनवाढीला चालना मिळेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, स्थानिक व्यापाऱ्यांना नव्या बाजारपेठा खुल्या होतील.आता या ५३ किमी मार्गावरील सिव्हिल वर्क पूर्ण झाल्यानंतरच ट्रॅक टाकणे सुरू होणार असल्याने नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काहींना वाटते की संपूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा, तर काहीजण या प्रगतीबाबत समाधानी आहेत. मात्र, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की अशा प्रकारचे मोठे प्रकल्प अनेक प्रशासकीय, पर्यावरणीय व तांत्रिक टप्प्यांतून जात असतात.

रेल्वे ई. पी. सी. (इंजीनियरिंग, प्रोक्रुरमेंट, व कन्स्ट्रक्शन) मॉडेलनुसार हे काम हाती घेतले जात असून अशोका बिल्डकॉनसारख्या तज्ज्ञ कंपनीकडे जबाबदारी देण्यात आल्यामुळे कामाची गती, गुणवत्ता आणि वेळेचे भान यासंदर्भात अपेक्षा अधिक आहेत.गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारकडून रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांना विशेष गती दिली जात आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील दुर्लक्षित प्रकल्प, जुन्या मीटर गेज मार्गांचे ब्रॉड गेज रूपांतर, नवीन जोडमार्ग, स्थानिक संपर्कवाढीच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे.या पृष्ठभूमीवर पाचोरा ते जामनेर मार्गाचे काम हाती घेण्यात येणे, ही सकारात्मक आणि दूरगामी परिणाम देणारी घडामोड आहे. भविष्यात या मार्गावरील प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होईल आणि त्याचा सामाजिक-आर्थिक विकासावर निश्चितच मोठा परिणाम होईल. पाचोरा ते जामनेर ब्रॉड गेज रेल्वे मार्गाच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक मानला जाऊ शकतो. अशोका बिल्डकॉनला मिळालेल्या ५६८ कोटींच्या कामाच्या माध्यमातून या प्रकल्पाला प्रत्यक्ष स्वरूप लाभणार आहे. कृती समितीचा संघर्ष, लोकप्रतिनिधींचा पाठिंबा, स्थानिकांचा विश्वास आणि केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची सकारात्मक भूमिका – या सर्वांचा संगम या टप्प्यावरून स्पष्ट दिसून येतो.आता केवळ काम वेळेत, गुणवत्तेने व पारदर्शकतेने पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रेल्वे प्रशासन, ठेकेदार संस्था, स्थानिक नागरिक व प्रशासनाने संयुक्तपणे सहकार्य केल्यास पाचोरा ते जामनेर रेल्वे मार्ग उत्तम उदाहरण ठरेल आणि भविष्यातील इतर प्रकल्पांसाठी मार्गदर्शक ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.