वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टरसह डंपर जप्त
पाचोरा पोलिस प्रशासन अॅक्शन मोडवर, अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले
पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
चोऱ्यात पोलिस प्रशासन अॅक्शन मोडवर आलेले असलेल्याचे बघावयास मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच शहरात दोन गावठी कट्टे व जीवंत काडतुसे घेवुन फिरणाऱ्या इसमास शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दुसरीकडे पाचोरा शहरासह परिसरात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन सुरु असुन यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबविली जात आहे. २७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल १६ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत तीन ट्रॅक्टर त्यातील तीन ब्रास वाळू व एक डंपर त्यातील ५ ब्रास वाळू जप्त केली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैधरित्या चोरटी गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे मात्र आता धाबे दणाणले आहे.
पाचोरा शहरासह परिसरातुन रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या चोरटी वाळु वाहतूक सुरु असल्याची माहिती पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना मिळाली. पोनि अशोक पवार यांनी पोउनि योगेश गणगे, पोउनि सुनिल पाटील, सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे, पोहेकाॅ राहुल शिंपी, पो. काॅ. भोजराज धनगर यांचे पथक तयार करुन २७ रोजी रात्री परिसरात रवाना केले. या पथकाने शहरातील विविध भागातुन अवैधरित्या चोरटी वाळु वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर व डम्पर ताब्यात घेत मोठी कारवाई केली.
यात आकाश सुभाष तडवी (वय २६, रा. कृष्णापुरी, पाचोरा) याच्या ताब्यातील ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर त्यात ४ हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू, समिर अमिर तडवी (वय १९, रा. आर्वे ता. पाचोरा) त्याच्या ताब्यातील ४ लाख किंमतीचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व त्यात ४ हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू, संजय देवचंद परदेशी रा. पुनगाव व आकाश लाडगे रा. पाचोरा यांचे ताब्यातील ५ लाख रुपये किंमतीचे डम्पर त्यात २० हजार रुपये किंमतीची ५ ब्रास वाळू, सुलतान दादाभाऊ तडवी (वय २१, रा. कृष्णापुरी, पाचोरा) याचे ताब्यातील ३ लाख रुपये किंमतीचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व त्यात ४ हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू असा १६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत संशयीतांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वरील चारही गुन्ह्यांचा पुढील तपास पोहेकाॅ राहुल शिंपी, ए. एस. आय. निवृत्ती मोरे, पो. हे. काॅ. विकास खैरे, पो. हे. काॅ. अशोक हटकर हे करीत आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैधरित्या चोरटी वाळु वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असुन यापुढे देखील अशीच धडक मोहीम सुरुच ठेवणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दैनिक लोकशाहीशी बोलतांना दिली.