पाचोरा भडगाव मतदार संघात बहीण भावाविरुद्ध लढत..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होणार असल्याची निवडणूक आयोगाने घोषणा केली. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा प्रमुख सामना होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील ११ जागांपैकी महाविकास आघाडी आणि महायुती यांचे उमेदवार अधिकृतपणे घोषित झाले नसले तरी कोणत्या मतदारसंघात कोणते उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले असून त्या दृष्टीने आपापल्या मतदारसंघात उमेदवार कामाला लागले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे पहिल्या ११ जणांच्या अधिकृत यादीत वैशाली सूर्यवंशी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडली, तेव्हा २०२४ विधानसभा निवडणुकीत वैशाली सूर्यवंशी आमदारकीच्या उमेदवार असतील, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यामुळे तब्बल दोन वर्षापासून वैशाली सूर्यवंशी पाचोरा भडगाव मतदार संघात कामाला लागल्या आहेत. या मतदारसंघातील विद्यमान आमदार किशोर पाटील हे शिंदे शिवसेनेत गेल्याने शिंदे शिवसेनेतर्फे किशोर आप्पा पाटील यांची महायुतीतर्फे उमेदवारी निश्चित असल्याने ते सुद्धा मतदार संघात कामाला लागले आहेत. त्यामुळे पाचोरा भडगाव मतदार संघात बहीण भावामध्ये आमदारकीच्या निवडणुकीचा सामना रंगणार आहे, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिंदे शिवसेना उमेदवारांमध्ये रंगत येणार आहे.

याच दरम्यान संघात मतदार संघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपशी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे सध्याचे भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हे अपक्ष उमेदवारी लढवून अवघ्या दोन हजार मताधिक्याने पराभूत झाले होते. अपक्ष निवडणूक लढवून अवघ्या दोन हजार मताने पराभूत होणाऱ्या अमोल शिंदे यांना भाजपचे तिकीट मिळाले असते तर मोठ्या फरकाच्या मताधिक्याने ते विजयी झाले असते. म्हणून २०२४ च्या निवडणुकीत भाजपतर्फे त्यांना उमेदवारी मिळावी, म्हणून भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांनी पक्षश्रेष्ठीकडे मागणी धरून ठेवली आहे. त्याला यश आलेले दिसत नाही. त्यामुळे पुन्हा बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत अमोल शिंदे आहेत.

२०१९ च्या निवडणुकीत भाजप तर्फे अंतर्गत सपोर्ट अमोल शिंदेंना मिळाला असल्यानेच त्यांचा निसटता पराभव झाला होता. आता त्याला कसा प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागले आहे. अमोल शिंदे यांनी सुद्धा मतदारसंघात प्रचाराच्या कामाला सुरुवात केली आहे. ते मराठा समाजाचे असून दुसरे एक मराठा समाजाचे उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी आमदार दिलीप वाघ हे सुद्धा पक्षातर्फे उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते. तथापि महाविकास आघाडीतर्फे ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने दिलीप वाघ बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे दोन अपक्ष मराठा उमेदवार आणि दोन राजकीय पक्षांतर्फे राजपूत उमेदवार यांच्यात चौरंगी सामना पाचोरा भडगाव मतदार संघात अटळ असला, तरी खरी लढत वैशाली सूर्यवंशी आणि आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यात होणार आहे.

विद्यमान आमदार किशोर पाटील आणि दिलीप वाघ यांच्यात गेले पाच वर्ष मित्रत्वाचे संबंध होते. त्या दोघांनी आपसात अर्थपूर्ण राजकारण करून दूध जिल्हा दूध संघात आणि जिल्हा सहकारी बँकेत संचालक पद घेतले. त्यानंतर गेल्या चार महिन्यांपर्यंत त्यांच्यात संबंध चांगले होते. विधानसभेत सुद्धा हे दोघे मित्रत्वाचे नाते जोपासतील असे वाटत होते. परंतु पाच सहा महिन्यांपूर्वीपासूनच विद्यमान आमदार किशोर पाटलांविरुद्ध दिलीप वाघ यांचे आरोप सुरू झाले. त्या आरोपाला किशोर पाटलांकडून जशास तसे उत्तर देणे सुरू झाले होते. अगदी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत वाघ यांनी किशोर पाटलांवर अवैध वाळू उपशाविरुद्ध जोरदार हल्ला केला होता.

दुसरे अपक्ष उमेदवार म्हणून लढू इच्छिणारे अमोल शिंदे आणि आमदार किशोर पाटील यांच्यात असलेले विळा भोपळ्याचे राजकीय वैमानस्य अख्ख्या मतदार संघाला माहित आहे. त्यामुळे किशोर पाटील हे जरी महायुतीचे उमेदवार असले तरी त्यांचे आणि आमदारात सख्य निर्माण होणे कठीण आहे, एवढे त्यांचे संबंध विकोपाला गेले आहेत. नवरात्रोत्सवात भडगाव येथे अमोल शिंदेंकडून आयोजित दांडियाच्या कार्यक्रमात आमदार किशोर पाटील समर्थकांकडून जो गोंधळ घातला गेला, शिवीगाळ करण्यात आली आणि दांडियाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये कुणाचा हात होता हे सर्वश्रुत आहे.

अमोल शिंदे सत्ताधारी भाजपचे पाचोरा तालुका अध्यक्ष असताना एवढ्या गंभीर घटनेत त्या आरोपाविरुद्ध फक्त एनसी दाखल झाल्याने अमोल शिंदे नाराज असल्याचे दिसून आले. त्यामुळे ते महायुतीची उमेदवार किशोर पाटलांशी हातमिळवणी करण्याची शक्यता दुरावत आहे. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पाचोरा भडगाव मतदार संघात चौरंगी सामना होणार, हे अटळ असल्याचे स्पष्ट होते…!

Leave A Reply

Your email address will not be published.