पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
खान्देशात मोठ्या प्रमाणावर गहू पिकाची लागवड केली जात आहे. शेतात लावलेल्या गहू पिकास पाणी भरताना इलेक्ट्रीक शाॅक लागल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आई वडिलांचा एकुलता एक आधार नियतीने हिरावुन घेतल्याने वृद्ध आई वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील वेरुळी खुर्द येथील भैय्या रमेश पाटील (वय ४०) हे १२ जानेवारी रोजी त्यांच्या शेतात लावलेल्या गहू पिकास पाणी भरण्यासाठी गेले होते. दरम्यान दुपारी ३ वाजेच्या सुमारास इलेक्ट्रीक पेटीवरुन पाणी चालु करताना भैय्या पाटील यांना जोरदार शाॅक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भैय्या पाटील यांच्या वृद्ध आई वडिलांनी एकच आक्रोश केला. ग्रामस्थांच्या मदतीने भैय्या पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी भैय्या पाटील यांना मृत घोषित केले. भैय्या पाटील यांचे पश्चात वृद्ध आई व वडिल असा परिवार असुन अत्यंत शांत व मनमिळाऊ स्वभावाचे भैय्या पाटील यांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.