पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडुन एका १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शहरातील भडगाव रोडवरील शक्तीधाम नजीक घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील राजीव गांधी काॅलनीत जितेंद्र गोसावी हे पत्नी, दोन मुले, वृद्ध आईसह वास्तव्यास आहेत. जितेंद्र गोसावी यांचा मोठा मुलगा रुद्र जितेंद्र गोसावी (वय १०) हा येथील कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयात इयत्ता तीसरीत शिक्षण घेत होता. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर रुद्र हा सायकल घेऊन शक्तीधामच्या दिशेने खेळण्यासाठी जात होता. तेवढ्यात समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरला बघुन रुद्रचा सायकलीवरील तोल गेल्याने रुद्र थेट ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडुन रुद्र याच्या डोक्याचा अक्षर:शा चेंदामेंदा झाला.
सदरचा प्रकार रुद्र याच्या आई, वडिलांना कळताच त्यांनी एकच हंबरडा फोडत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरुन रुद्रचा मृतदेह मुकेश पाटील (पुनगाव) यांनी रुग्णवाहिकेतुन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात रुद्र याची वृद्ध आजीचा आक्रोश पाहुन उपस्थितांची डोळे पाणावले होते.
घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये जितेंद्र गोसावी यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक विजय उर्फ बबलु अशोक थोरात रा. पुनगाव ता. पाचोरा याचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे हे करीत आहे.