पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
पाचोरा शहरात सुरु असलेल्या बांधकामाची भिंत अंगावर पडल्याने तालुक्यातील भातखंडे खुर्द येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा बांधकाम कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
रविवारी झालेल्या या अपघातात उपसरपंच हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मंगळवार १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्यासुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भातखंडे खुर्द ता. पाचोरा येथील विलास रतीलाल कुमावत (वय ३९) हे येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदाची जबाबदारी सांभाळत स्वतः बांधकाम गवंडी काम करुन उदरनिर्वाह चालवित होते. रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी पाचोरा शहरातील भडगाव रोडवर बांधकामावर गेलेल्या विलास कुमावत यांच्या अंगावर बांधकामाची भिंत कोसळली.
या अपघातात विलास कुमावत हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दोन दिवस मृत्युशी झुंज देत असतानाच विलास कुमावत यांचा उपचारादरम्यान मंगळवार १० सप्टेंबर रोजी सकाळी ६:३० वाजता दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत विलास कुमावत यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अत्यंत हसमुख व शांत स्वभावाचे विलास कुमावत यांच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.