जळगाव ;- कर्ज फेडण्यासाठी ८० वर्षीय आजीचा खून करून मृतदेह गोणपाटामध्ये टाकून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळगाव हरेश्वर १५ रोजी उघडकीस आला असून हा खून नातवानेच केला असल्याचा उलगडा एलसीबीच्या पथकाने अवघ्या चार तासांत करून आरोपी नातवाला ताब्यात घेण्यात आले आहे . दरम्यान या खुनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवासी असलेल्या मांजाबाई दगडु भोई (वय ८०, रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा) असे मयत आजीचे नाव आहे. त्या आपल्या घरात एकट्याच राहत होत्या. बुधवारी दि. १५ मे रोजी सायंकाळी वृद्धेला कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे घरात तिला जिवे ठार मारुन गोणपाटमध्ये बांधून ठेवले असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना मिळाली होती. त्यांनी एलसीबीला घटनास्थळी जावून पुढील तपास करणेबाबत आदेश दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, सफौ विजयसिंग पाटील, पोह लक्ष्मण पाटील, विजय पाटील, महेश महाजन, अकरम शेख, महेश सोमवंशी हे सर्व फत्तेपुर ता.जामनेर येथून तेथील खुनाचा तपास करीत असताना पिंपळगाव हरेश्वर येथे पोहचले. मयत मांजाबाई हिचे बहिणीचा नातू विशाल भोई याने हे हत्येचे कृत्य केले असल्याची माहिती पथकाला मिळाली.
विशाल याला ताब्यात घेतले. विशाल प्रभाकर भाई, (वय २२, रा. पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा) असे त्याने नाव सांगीतले. एलसीबीच्या पथकाने विशाल भोई यास विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, माझ्यावर कर्ज झाले असल्याने कर्ज फेड करणेकरीता मी आजीकडून पैश्यांची मागणी केली होती. त्यावर आजीने मला नकार दिल्याने मी आजी मंजाबाई हिचा गळा दाबुन तिला जिवेठार मारले.
त्यानंतर तिचे हातातील चांदीचे गोटपाटल्यापैकी १ गोटपाटली व कानातील सोन्याच्या बाळया काढून घरात असलेल्या गोणपाटमध्ये भरुन तिथे घरात ठेवले. व मी मागच्या दरवाज्याने बाहेर निघुन मोटार सायकलने अजिंठा ता. अजिंठा जि.संभाजीनगर येथे जावून तिथे एका सोनार दुकानावर मोडून तिथून पैसे घेवून परत पिंपळगाव हरेश्वर येथे घरी आलो होतो, अशी गुन्ह्याची कबुली दिली आहे. संशयीत आरोपी विशाल प्रभाकर भाई यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आला .