पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
रेल्वे रूळ ओलांडू नका असे रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते, मात्र लोक तरीही रेल्वे रूळ ओलांडतांना आपला जीव गमावून बसतात. अशीच एक दुर्देवी घटना घडली आहे.शेजारच्या गावात हरिनाम सप्ताह असल्याने प्रसाद घेण्यासाठी दुसखेडा (ता. पाचोरा) गावातील काही नागरिक रूळ ओलांडून जात असतांना धावत्या रेल्वेखाली सापडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात प्रसादासाठी दुसखेडा येथील काही ग्रामस्थ व महिला भाविक रेल्वेमार्गाजवळून जात होते. दुसखेडा गावाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना रत्नाबाई माधव पाटील (वय ५९) व अशोक झेंडू पाटील (वय ६०) यांना भरधाव रेल्वेची जोरदार धडक बसली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेल्या काही नागरिकांना धक्का बसून जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.मृतातील अशोक पाटील हे मूळचे पहाण (ता. पाचोरा) येथील रहिवासी असून कुरंगी शिवारातील शेती करण्यासाठी दोन वर्षांपासून ते दुसखेडा येथे वास्तव्यास होते.