लोकशाही संपादकीय लेख
जळगाव जिल्हा हा देशात केळी पिकाचा उत्पादक क्रमांक एकचा जिल्हा म्हणून ओळख मिळवून आहे. जिल्ह्यात एकूण 68 हजार हेक्टर क्षेत्रात केळीची लागवड होते. जळगाव जिल्ह्यातील केळीची चव उत्कृष्ट आहे. केळीचा दर्जा उत्तम आहे. तथापि अलीकडे देशात विशेषतः गुजरातमध्ये आणि आपल्या जळगाव जिल्ह्या लगत असलेल्या बऱ्हाणपूर पर्यंत केळीव फ्युजारियम विल्ट आणि सीएमव्ही (क्युकुम्बर मोजेक व्हायरस) या भयंकर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. जळगाव जिल्ह्यात वेळीच योग्य पाऊल उचलणे आवश्यक आहे. अन्यथा केळी पिकासाच्या उत्पादनासाठी या दोन भयंकर रोगांमुळे फार मोठे घातक परिणाम समोर येऊ शकतात. आपल्या जळगाव येथील जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम लि. तर्फे जिल्ह्यातीलच नव्हे तर सोलापूर जिल्हा तसेच अनेक भागात केळीच्या उत्पादन वाढीसाठी फार मोठे योगदान आहे.
आता केळीवर प्रादुर्भाव होणाऱ्या दोन भयानक रोगांच्या नियंत्रणासाठी जैन इरिगेशन आणि राष्ट्रीय संशोधन केंद्र यांच्यात केळी पिकावरील रोग व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला. हे एक महत्त्वाचे पाऊल असून केळीवरील ज्या दोन रोगांमुळे पिकाला फार मोठा धोका निर्माण झाला आहे. त्याच्यावर नियंत्रण आणले जाणार आहे. केळीच्या बागेत येणाऱ्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संशोधन कार्य वाढीस लागणार आहे. त्याबद्दल जैन उद्योग समूहाचे हे एक फार मोठे योगदान ठरणार आहे. या करारावर राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्वराजन आणि जैन इरिगेशनच्या टिशू कल्चर विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील यांनी स्वाक्षरी केली आहे.
या सामंजस्य कराराचा फायदा जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र व देशातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. कारण केळी हे पीक आधी रोगापासून दूर होते. तथापि काही वर्षांपूर्वी करपा सारख्या रोगाचा प्रादुर्भाव केळीवर झाला. त्याच्या नियंत्रणासंदर्भात यश आले असतानाच आता हे दोन भयंकर रोग येणे म्हणजे केळी पिकासाठी धोकादायक घंटा असल्याचे जैन इरिगेशनचे डॉ. के. बी. पाटील यांचे म्हणणे आहे. केळीवर एकदा हा रोग पडला किंवा त्याचा प्रादुर्भावच झाला तर तो रोग जमिनीत जातो आणि किमान 30 वर्ष तो त्या जमिनीत असतो. त्याचा परिणाम म्हणून त्या जमिनीत केळीची लागवड केली तरी ते केळी पीक उध्वस्त होते. म्हणून त्याचे नियंत्रण वेळीच केले गेले नाही तर त्यावर नियंत्रण आणणे हाताबाहेर जाते. म्हणून हा सामंजस्य करार अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जैन उद्योग समूह जागतिक स्तरावर विविध संशोधन करीत असते. त्यातलाच हा एक सामंजस्य करार होय. केळी उत्पादनासाठी हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सध्या केळी पिकावरील फ्युजारियम विल्ट आणि सीएमव्ही (क्युकुम्बर मोजेक व्हायरस) या दोन भयंकर रोगांचे आव्हान केळी संशोधन केंद्रापुढे आहे. जळगाव जिल्ह्यात किरकोळ प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाला असून त्याच्या नियंत्रणासाठी आणि तो रोग जिल्ह्यात पसरणार नाही यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. अन्यथा जिल्ह्यातील केळी उत्पादनावर फार मोठा परिणाम होऊ शकतो. जळगाव जिल्हा हा केळी पीक उत्पादनाचे आगार असून संपूर्ण देशात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची आहे. असे असताना महाराष्ट्र शासन मात्र उदासीन आहे, ही खंत होय.
68 हजार हेक्टर क्षेत्रात जिल्हा केळीची लागवड होते. केळी पीक लागवडीत जळगाव जिल्हा देशात प्रथम स्थानावर असताना शासनाकडून मात्र ज्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या, त्या दिल्या जात नाहीत. म्हणून अवघे 14 हजार हेक्टर क्षेत्रातील केळीचे उत्पादन घेणारा सोलापूर जिल्हा शंभर टक्के उत्पादित केळी निर्यात करतो. ही तफावत का? त्याचे आत्मपरीक्षण केले तर शासनाची उदासीनता त्याला कारणीभूत असल्याचे दिसून येते. गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात असलेले केळी संशोधन केंद्र फक्त नावालाच आहे. त्याच्या संशोधनासाठी तसेच विस्तारासाठी अनेक मुख्यमंत्र्यांनी निधीची घोषणा केली, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. 68 हजार हेक्टर क्षेत्रात केळीची उत्पादन घेणाऱ्या जळगाव जिल्ह्यात एकही कोल्ड स्टोरेज नाही. मात्र सोलापूर जिल्ह्यात 30 हजार टन केळीची साठवण होईल एवढ्या क्षमतेचे कोल्ड स्टोरेज आहे. सोलापूरला मुंबईचे अंतर कमी असल्याने वाहतूक खर्चही कमी येतो. जळगाव ते मुंबईचे अंतर लांबचे असल्याने वाहतूक खर्च जास्त होतो. शासनाने वाहतूक खर्चात सवलत देणे अपेक्षित आहे.
तथापि शासनाकडून शेतकऱ्यांची ही मागणी पूर्ण केली जात नाही. जिल्ह्यातील स्थानिक नेते त्यासाठी काही प्रयत्न करीत नाही, हे दुर्दैव होय त्यामुळे आपला जिल्हा केळी उत्पादनात आघाडीवर असतानाही सुविधांअभावी तो मागे पडतो आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याचे केळी उत्पादन असलेले वैभव आपणच कमी करतो आहोत, याचे भान आमच्या लोकप्रतिनिधींना नाही, ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादन शेतकऱ्यांना तसेच सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी जैन उद्योग समूहासारखे तंत्रज्ञान सहकार्य करीत असताना सोलापूर जिल्हा जळगाव पेक्षा पुढे जातो ही जिल्ह्याच्या दृष्टीने नामूशकीची म्हणावी लागेल…!

