लोकशाही न्यूज नेटवर्क
तमिळनाडूच्या राजकारणात सध्या नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करत पहिल्याच विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यात यशस्वी झालेल्या सी. जोसेफ विजय यांच्यासमोर आता विरोधकांचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. विजय यांच्या टीव्हीके विरोधात विविध पक्षांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे.
एआयएडीएमकेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एडाप्पडी के. पळनिस्वामी हे टीव्हीकेविरोधात उभे राहण्याची शक्यता आहे. त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत स्पष्टपणे सांगितले की, एआयएडीएमके पक्ष टीव्हीकेच्या विरोधात आहे. तसेच इतर कोणत्याही पक्षाला आमच्यासोबत या आघाडीत सहभागी व्हायचे असल्यास त्यांचे स्वागत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, पळनिस्वामी यांनी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकलाही अप्रत्यक्षपणे या आघाडीत सहभागी होण्याचे आव्हान दिले. “डीएमके आमच्यासोबत येईल का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे एआयएडीएमके आणि डीएमकेसारखे राजकीय प्रतिस्पर्धी टीव्हीकेविरोधात एकत्र येणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर एआयएडीएमकेच्या सहा आमदारांनी पक्ष सोडून विजय यांच्या गटाला साथ दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षातील राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम झाल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, डीएमकेने अद्याप एआयएडीएमकेच्या या प्रस्तावावर अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. यापूर्वी डीएमके नेते आर. एस. भारती यांनी दोन्ही पक्षांच्या संभाव्य एकत्र येण्याबाबत चर्चा फेटाळली होती.

