दहशतवादाच्या मुद्द्यावर तडजोड नाहीच !

0

लोकशाही संपादकीय लेख 

कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशविरोधातील युद्ध मानले जाईल, असे केंद्र सरकारने जाहीर केले आणि काही तासांतच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी झाल्याचे घोषित केले. अमेरिकेने केलेल्या मध्यस्थीमुळेच दोन्ही देशांनी शस्त्रसंधी किंवा युद्धविराम मान्य केला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री मार्को रूबियो यांनी दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्याशी चर्चा केली. त्यानंतर अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करण्याचे मान्य केल्याचे एक्सवरून पोस्ट केली आणि दोन्ही देशांचे अभिनंदन केले. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाल्याचे प्रथम अमेरिकेने जाहीर केले व नंतर भारताने त्याला दुजोरा दिला. दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाल्यानंतर भारताने हवाई, जमीन आणि सागरी मार्गावरून हल्ले थांबविण्यात येत असल्याचे जाहीर केले. मात्र दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जाहीर करून पाकिस्तानला शस्त्रसंधीनंतर सज्जड इशारा दिला आहे.

शस्त्रसंधी झाल्यामुळे दोन्ही देशांवर होणारे हल्ले थांबतील. गोळीबार, ड्रोन, क्षेपणास्त्रे यांचा वर्षाव थांबेल पण पाकिस्तानप्रेरीत दहशतवाद थांबेल काय? पहलगाम किंवा पुलवामा येथे निरपराध नागरीकांचे आणि सुरक्षा दलाचे जे भीषण हत्याकांड झाले, ते घडविणारे दहशतवादी कुठे गेले? त्यांना प्रशिक्षण कोणी दिले? त्यांना शस्त्रे व स्वयंचलित बंदुका कोणी दिल्या? त्यांना कोणी पाठवले? तुमचा धर्म कोणता हे विचारून हिंदू पर्यटकांना त्यांच्या परिवारासमोर पाँइंट ब्लँक गोळ्या घालून ठार करा असे त्यांना कोणी सांगितले? हत्याकांडानंतर त्यांना कोणी लपवले? त्यांना कोणी संरक्षण दिले? या प्रश्नांची उत्तरे शस्त्रसंधीनंतर मिळणार आहेत का? या प्रश्नांची उत्तरे देण्यास अमेरिका पाकिस्तानला भाग पाडणार आहे का? शस्त्रसंधीमुळे पाकिस्तान सुधारणार आहे का? त्याची हमी कोण घेणार? आणखी काही दिवस युद्ध चालले असते, तर भारताच्या ताकदवान व कुशल सेना दलापुढे पाकिस्तानची दाणादाण उडाली असती. अंतर्गत असंतोषामुळे पाकिस्तानचे आणखी तुकडे झाले असते. शस्त्रसंधीसाठी अमेरिकेने दोन्ही देशांवर दबाव आणला.

दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला असताना आम्ही त्यात मध्ये पडणार नाही असे अमेरिका दोन दिवसांपूर्वी सांगत होती मग मध्यस्थी करावी असे अचानक काय घडले? शस्त्रसंधीचा लाभ नेमका कोणाला होणार? दहशतवाद चालूच राहणार असेल, तर शस्त्रसंधी कशासाठी व कोणासाठी? भारतीय सैन्य दलाने गेल्या चार दिवसांत पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आणि पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निसर्गाचा आनंद लुटायला आलेल्या 26 पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या. परिवारातील महिलांच्या समोर त्यांच्या पतींची हत्या केली. दहशतवाद्यांना हात जोडून आपल्या पतीला मारू नका अशी विनंती करणाऱ्या महिलांना, जाके मोदी से कह दो. असे त्यांनी बंदुका रोखून बजावले.

काश्मीरच्या नंदनवनात परिवारासह गेलेल्या महिला आपल्या पतीचा मृतदेह घेऊन आपल्या घरी परतल्या. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने 7 मेच्या मध्यरात्रीनंतर ऑपरेशन सिंदूर मोहीम सुरू केली आणि पाकिस्तानात घुसून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. त्यात शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाले. ऑपरेशन सिंदूर मोहीम राबविताना भारतीय सैन्य दलाने जगाला संदेश दिला की, सिव्हिलियन्स से कोई बैर नही, आतंकवादीयों की खैर नहीं.

पहलगाम हत्याकांडानंतर सर्व जगाला दिसून आले की पाकिस्तान व दहशतवादी यांचे नाते कसे जवळचे आहे. पाकिस्तान व दहशतवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे भारताने अनेकदा जगापुढे पुराव्यांसह मांडले आहे. भारतात दहशतवाद घडविणाऱ्यांचा सूत्रधार मसूद अजहर याच्या नातेवाइकाच्या अंत्ययात्रेला पाकिस्तानमध्ये पोलीस आणि लष्करी अधिकारी गणवेशात उपस्थित राहतात, त्याला मानवंदना दिली जाते. दहशतवाद्यांच्या मृतदेहाला पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळून त्याचा शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार होतो, याच्या क्लिप्स्‌ व फोटो भारताने जगापुढे मांडले आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा सज्जड पुराव्यानिशी उजेडात आला. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना कसे संरक्षण दिले जाते, याचे फोटो व व्हिडीओ भारताने जगापुढे मांडले. पाकिस्तानचे लष्करी अधिकारी व लष्कर-ए-तोयबाचे कमांडर अब्दुल रहुफ एकत्र असतानाचे पुरावेच भारताने जाहीर केले.

पहलगाम हत्याकांडात ज्या महिलांचे कुंकू पुसले गेले त्या महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न ऑपरेशन सिंदूरने केला आहे. ऑपरेशन सिंदूर हा कारगिल, मुंबई, अमरनाथ यात्रा, पठाणकोट, उरी, पुलवामा, पहलगाम अशा दहशतवादी हल्ल्यांचा बदला घेणारी मोहीम आहे. लढाई अजून संपलेली नाही. मुंबई पोलीस दलातील निवृत्त सहायक आयुक्त सुजाता पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे-ऑपरेशन सिंदूर हा शब्द ऐकूनच डोळ्यांत पाणी आलं. जय हो. सन्मानीय मोदीजी, भारतीय सेना, जय हिंद…!

Leave A Reply

Your email address will not be published.